पणजी/मुंबई - मुंबईहून गोव्याला गेलेल्या आणि पुन्हा मुंबईत सकाळी 6 वाजता आलेल्या कार्डिलिया क्रूझमधील प्रवाशांच्या आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी 66 प्रवासी कोरोना पॉजिटिव्ह आले आहेत. या पॉझिटीव्ह प्रवाशांना भायखळा येथील कोविड सेंटरमध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे. इतर प्रवाशांच्या आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या असून त्यांचा अहवाल उद्या सकाळी आल्यावर निगेटिव्ह आलेल्या प्रवाशांना 7 दिवस होम क्वारंटाईन केले जाणार आहे.
66 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह -
मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, पर्यटकांना घेऊन कार्डिलिया क्रूझ गोव्याला गेली होती. गोव्यात गेल्यावर या क्रूझमधील प्रवाशांची चाचणी केली असता त्यामधील काही प्रवासी पॉझिटीव्ह आल्याने क्रूझमधील प्रवाशांना पाण्यातच क्वारंटाईन केले होते. आज सकाळी 6 वाजता कार्डिलिया क्रूझ मुंबईच्या ग्रीन गेट येथे आली. पालिकेने क्रूझमधील प्रवाशांची चाचणी केली असता त्यामधील 66 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.
7 दिवस क्वारंटाईन -
क्रूझवरील इतर प्रवाशांना आरटीपीसीआर चाचण्या करण्यास सांगण्यात आले आहे. या प्रवाशांना त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याशिवाय क्रूझच्या बाहेर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. क्रूझवरील प्रवाशांचा अहवाल उद्या सकाळी आल्यावर ज्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह येतील त्यांना घरी पाठवून 7 दिवस क्वारंटाईन राहण्यास सांगितले जाणार आहे.
कार्डिलिया क्रूझ आणि वाद -
मागील वर्षी कार्डिला क्रूझवर झालेल्या ड्रग्स पार्टी प्रकरणी सुपरस्टार शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खानला एनसीबीने अटक केली होती. त्यानंतर गेले काही महिने हे प्रकरण गाजले होते. आता पुन्हा कार्डिला क्रूझवर गेलेले प्रवासी कोरोना पॉजिटीव्ह आढळून आले आहेत. कार्डिला क्रूझच्या नावाने दुसऱ्यांदा वाद समोर आला आहे.
गोव्याहुन पुन्हा मुंबईत -
कार्डिलिया जहाज मुंबईहून शनिवारी संध्याकाळी पर्यटकांना घेऊन गोव्याकडे रवाना झाले होते. यात 1471 पर्यटक आणि 596 क्रु मेंबर असे एकूण 2067 प्रवासी होते. यातील 66 प्रवाशांना कोविडची बाधा झाली होती. त्यामुळे या जहाजाला भर समुद्रातच खोलवर नांगरून ठेवण्यात आले होते. अखेर सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास हे जहाज पुन्हा मुंबईच्या दिशेने (Cardilia sails to Mumbai again) माघारी पाठवण्यात आले. आज सकाळी हे क्रूझ मुंबईत आले आहे.