नवी दिल्ली - पंजाबमध्ये राजकीय घमासान सुरू आहे. माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकल्यानंतर पंजाबमध्ये राजकीय वादाचं महानाट्य पाहायला मिळते आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी नव्या पक्षाची घोषणा करून भाजपासोबत युतीचे संकेत दिल्यानंतर कॅप्टन विरूद्ध काँग्रेस असा सामना रंगताना दिसत आहे. काँग्रेस नेत्यांनी अमरिंदर सिंग यांचे पाकिस्तानी मैत्रिण अरुसा आलम यांचा मुद्दा उठवला आहे. यामुळे पंजाबचे राजकारण ढवळून निघाले आहे. शुक्रवारी पंजाबचे गृहमंत्री सुखजिंदर रधांवा यांनी अरुणा आलम यांचे आयएसआय या पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेशी असलेल्या कथित संबंधांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. यानंतरच अमरिंदर सिंग यांनी एकानंतर एक टि्वट करत आपली बाजू मांडली आहे. त्यांनी सोनिया गांधी आणि अरूसा आलम यांचा सोबतचा एक फोटो टि्वट करत काँग्रेसला प्रत्युत्तर दिले आहे.
अमरिंदर सिंग आणि पंजाबचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री रंधावा आमने-सामने आले आहेत. शुक्रवारी संध्याकाळी उपमुख्यमंत्री सुखजिंदर सिंह रंधावा यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून पंजाबी भाषेत एक ट्विट केले. अरुसा आलमचे पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयशी कथित संबंधांची चौकशी करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत, असे त्यांनी टि्वटमध्ये म्हटलं होते. मात्र, हे ट्विट नंतर त्यांनी हटवले आणि पत्रकारांशी बोलताना आपण कोणतेही आदेश दिले नसल्याचे स्पष्ट केले.
अरुणा सालम वादात सापडल्यानंतर अमरिंदर सिंग यांनीही टि्वट करत अरुणा आलम यांची माहिती जारी केली. 'रंधवा कोणाकडे बोट दाखवत आहेत? अरुसा या गेल्या 16 वर्षांपासून भारतात येत आहे आणि या काळात केंद्रात काँग्रेस आघाडीचे सरकारही होते. तेव्हाही अरुसा केंद्र सरकारची परवानगी घेतल्यानंतर येत असे आणि त्यानंतरही ती फक्त केंद्राच्या परवानगीने येत होती', असे कॅप्टन यांनी टि्वटमध्ये म्हटलं. सणासुदीच्या वेळी पंजाबला सीमेपलीकडून सुरक्षेचा मोठा धोका असताना रंधावा या प्रकाराच्या तपासात पंजाबच्या डीजीपींना गुंतवून काय साध्य करू पाहत आहेत, असाही सवाल सिंग यांनी केला.