चंदीगड- पंजाबच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलेले अमरिंदर सिंग यांनी नवज्योत सिंग विरोधात पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे. नवज्योत सिंग सिद्धू यांना पंजाबचे मुख्यमंत्री होण्यापासून रोखण्याकरिता कोणताही त्याग करण्याची तयारी असल्याचे कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी जाहीर केले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीकरता काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा केल्यास त्यांच्याविरोधात मजबूत उमदेवार देणार असल्याचेही कॅप्टन अमरिंदर यांनी जाहीर केले आहे.
कॅप्टन अमरिंदर सिंग म्हणाले, की नवज्योत सिंग सिद्धू हे देशाला मोठा धोका आहेत. त्यामुळे त्यांना कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्री होऊ देणार नाही. माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी नवज्योत सिंग सिद्धू आणि काँग्रेस हायकमांडविरोधात राग व्यक्त केला आहे. अमरिंदर सिंग म्हणाले, की राहुल आणि प्रियंका गांधी हे अनुभवहीन आहेत. त्यांचे सल्लागार चुकीचा सल्ला देत आहेत.
संबंधित बातमी वाचा-पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर अमरिंदर सिंग म्हणाले,...
पंजाबच्या मुख्यमंत्री पदी चरणजीत सिंह चन्नी यांची नियुक्ती झाल्यानंतर कॅप्टन हे पुढील खेळी खेळणार असल्याचे बोलले जात आहे. कॅप्टन अमरिंदर यांनी चन्नी यांच्या मुख्यमंत्री पदाच्या शपथविधी सोहळ्यात सहभागी होण्यास नकार दिला होता. हायकमांडच्या निर्णयावर कॅप्टन अमरिंदर सिंग हे नाराज आहेत.
संबंधित बातमी वाचा-नवज्योतसिंग सिद्धू यांचे पाकिस्तानशी संबंध; त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या नावाला विरोध- अमरिंदर सिंग
गांधी बहीण-भाऊ हे अनुभवहीन
कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यावतीने त्यांचे माध्यम सल्लागार रवीन ठुकराल यांनी सलग काही ट्विट केली आहेत. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले, की मी जिंकल्यानंतर राजकारण सोडण्यासाठी तयार होतो. मात्र, मी पराभव झाल्यानंतर कधीही राजकारण सोडण्यासाठी तयार नव्हतो. तीन आठवड्यापूर्वीच मी सोनिया गांधी यांना राजीनामा दिला होता. मात्र, त्यांनी पदावर राहण्यास सांगितले होते. त्यांनी फोन करून पद सोडण्यास सांगितले असते, तर मी तसेही केले असते. कॅप्टन यांनी पुढे ट्विटमध्ये म्हटले की, प्रियंका आणि राहुल हे माझ्या मुलांसारखे आहेत. अशाप्रकारे हे संपणे योग्य नव्हते. मी दु:खी आहे. वस्तुस्थिती अशी आहे, की गांधी बहीण-भाऊ हे अनुभवहीन आहेत. त्यांचे सल्लागार त्यांना स्पष्टपणे चुकीचे सांगत आहेत.
हेही वाचा-दलित नेते चरणजित सिंह चन्नी यांनी घेतली पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ
राजीनामा दिल्यानंतरही अमरिंदर सिंग यांनी नवज्योत सिंग सिद्धू यांच्यावर केली होती टीका-
कॅप्टन अमरिंदर सिंग म्हणाले होते, की नवज्योत सिंग सिद्धू हे अकार्यक्षम माणूस आहेत. ते मोठे संकट होणार आहेत. पुढील मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या नावाला विरोध असणार आहे. त्यांचे पाकिस्तानबरोबर संबंध आहेत. नवज्योत सिंग हे देशाच्या सुरक्षेला मोठा धोका असणार आहेत. सिद्धू हे पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान व पाकिस्तानच्या लष्कर प्रमुख कमर जावेद बाजवा यांचे मित्र आहेत. मी माझ्या देशासाठी पंजाबचे मुख्यमंत्री पदाकरिता नवज्योत सिंग सिद्धू यांच्या नावाला विरोध करणार आहेत. हा देशाच्या सुरक्षेचा विषय आहे.