महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'शर्यत अजून संपली नाही...'; ९२ वेळा निवडणूक हरलेल्या पठ्ठ्याने पुन्हा भरला फॉर्म

९२ निवडणुका हरलेले हसनुराम यांनी आपला आत्मविश्वास मात्र गमावला नाही. प्रत्येक वेळी ते तेवढ्याच उत्साहाने निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरतात, प्रचार करतात आणि हरतात! आता एवढ्या निवडणुका हरल्यानंतर त्यांना शतक करण्याचे वेध लागले आहेत. हसनुराम यांची पत्नी शिवदेवीही यावर्षी निवडणूक लढवत आहे...

Candidate who lost elections over 90 times files for zilla panchayat election
'शर्यत अजून संपली नाही...'; ९२ वेळा निवडणूक हरलेल्या पठ्ठ्याने पुन्हा भरला फॉर्म

By

Published : Apr 5, 2021, 8:47 AM IST

लखनऊ :उत्तर प्रदेशमध्ये पंचायत निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आग्र्यामध्ये यासाठी कित्येक दिग्गज उमेदवारी अर्ज भरत असले, तरी सध्या चर्चा मात्र केवळ एकाच नावाची सुरू आहे. अम्बेडकरी हसनुराम अम्बेडकरी असे या उमेदवाराचे नाव आहे. यावर्षी उमेदवारी अर्ज भरण्याची त्यांची ही ९३वी वेळ आहे. विशेष म्हणजे गेल्या ९२ निवडणुकांमध्ये त्यांनी पराभवच स्वीकारला आहे.

'शर्यत अजून संपली नाही...'; ९२ वेळा निवडणूक हरलेल्या पठ्ठ्याने पुन्हा भरला फॉर्म

कोण आहेत हसनुराम?

अम्बेडकरी हसनुराम हे एक मनरेगा कामगार आहेत. त्यांचा जन्म १५ ऑगस्ट १९४७ला खैरागडमधील रामनगरमध्ये झाला होता. त्यांच्या पत्नीचं नाव शिवदेवी आहे. १९८५ पासून हसनुराम निवडणुका लढवत आहेत. अगदी सरपंच ते राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकांचा यात समावेश आहे.

बंडखोरी करुन लढवली होती पहिली निवडणूक..

हसनुराम सांगतात, की १९८५पासूनच ते बसपचे निष्ठावान कार्यकर्ते होते. १९८८मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी त्यांनी पक्षाला तिकीट मागितले होते. मात्र, तेव्हा पक्षातील एका वरिष्ठ नेत्याने त्यांना तिकिट नाकारले. एवढेच नाही, तर "तुला तर तुझी बायकोही नीट ओळखणार नाही; लोक काय मत देतील?" असं म्हणत त्यांचा अपमानही केला. तेव्हा त्यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता. यानंतर ते सातत्याने निवडणूक लढवत आहेत.

शतक करण्याचा निर्धार..

९२ निवडणुका हरलेले हसनुराम यांनी आपला आत्मविश्वास मात्र गमावला नाही. प्रत्येक वेळी ते तेवढ्याच उत्साहाने निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरतात, प्रचार करतात आणि हरतात! आता एवढ्या निवडणुका हरल्यानंतर त्यांना शतक करण्याचे वेध लागले आहेत. हसनुराम यांची पत्नी शिवदेवीही यावर्षी निवडणूक लढवत आहे.

प्रचारासाठी करत नाही एक पैसाही खर्च..

हसनुराम म्हणतात, की मी निवडणूक लढतोच केवळ हरण्यासाठी. त्यामुळं मग प्रचारासाठी पोस्टर, बॅनर किंवा इतर खर्च कशाला करायचा? माझा प्रचार करताना मी केवळ लोकांना जाऊन भेटतो, आणि मला मत देण्याची विनंती करतो. पैसा खर्च करणं हे मोठ्या राजकीय पक्षांचं काम आहे. मी आजपर्यंत निवडणूक प्रचारासाठी किंवा मतं मिळवण्यासाठी एक पैसाही खर्च केला नाही.

हेही वाचा :कसला बर्ड फ्लू अन् कसलं काय; तामिळनाडूमध्ये बिर्याणीची डिमांड झाली 'हाय'!

ABOUT THE AUTHOR

...view details