नवी दिल्ली : भारतात 2022 मध्ये उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक कॅन्सरचे रुग्ण नोंदवले गेले आहेत. त्यापाठोपाठ महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालचा नंबर आहे. आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी लोकसभेत ही माहिती दिली.
भारतात कर्करोगाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ : आरोग्य आणि कुटुंबकल्याण राज्यमंत्री सत्यपाल सिंह बघेल यांनी सांगितले की, उत्तर प्रदेशात गेल्या एका वर्षात 2,10,958 कॅन्सर रुग्णांची नोंद झाली आहे. तर याच कालावधीत महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्ये अनुक्रमे 1,21,717 आणि 1,13,581 रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या तीन वर्षांत संपूर्ण भारतात कर्करोगाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. आकडेवारी देताना बघेल म्हणाले की, 2020 मध्ये भारतात कर्करोगाच्या 13,92,179 रुग्णांची नोंद झाली होती. तर 2021 मध्ये 14,26,447 आणि 2022 मध्ये 14,61,427 रुग्णांची नोंद झाली. इतर तीन प्रमुख राज्यांमध्ये, 2022 मध्ये बिहारमध्ये 1,09,274, तामिळनाडूमध्ये 93,536 व कर्नाटकमध्ये 90,349 प्रकरणे नोंदवली गेली आहेत.
कॅन्सर सेवेसाठी सरकार वाढवत आहे सुविधा : बघेल म्हणाले की 'केंद्र सरकार कॅन्सर सेवेसाठी सुविधा वाढवण्याची योजना राबवत आहे. योजनेंतर्गत, 19 राज्य कर्करोग संस्था (SCIs) आणि 20 तृतीयक कर्करोग काळजी केंद्रे (TCCC) मंजूर करण्यात आली आहेत. आतापर्यंत 17 सुविधा कार्यान्वित आहेत. एसपी मेडिकल कॉलेज, बिकानेर, एसएमएस मेडिकल कॉलेज, जयपूर आणि झालावाड मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल, झालावाड यांना योजनेअंतर्गत मान्यता देण्यात आली आहे.
कुठे किती उपचार केंद्रे आहेत : बघेल म्हणाले की, कर्करोगावर उपचारासाठी हरियाणातील झज्जर येथे नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटची स्थापना केली जात आहे. तसेच कोलकाता येथील चित्तरंजन नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचे दुसरे कॅम्पस देखील उघडले जात आहे. यामुळे देशात कर्करोगावर उपचार करण्याची क्षमता वाढेल, असे ते म्हणाले. आकडेवारीनुसार, पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक (3) कर्करोग काळजी केंद्रे आहेत, महाराष्ट्रात 2 कर्करोग काळजी केंद्रे आणि 1 राज्य कर्करोग संस्था आहे. तर राजस्थानमध्ये दोन टीसीसीसी आणि एक एससीआई आहे. बघेल म्हणाले की, उत्तर प्रदेशातील चार, राजस्थानमधील दोन आणि झारखंड, पंजाब, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, बिहार आणि केरळमधील प्रत्येकी एक अशा 13 सरकारी वैद्यकीय संस्थांमध्ये सरकारने कर्करोगाच्या उपचारांसाठी पुढाकार घेतला आहे.
हेही वाचा :
- Murmure Benefits : मुरमुरे केवळ वजनच नाही तर उच्च रक्तदाब देखील नियंत्रित करतात, जाणून घ्या त्याचे आश्चर्यकारक फायदे
- Haemoglobin : हिमोग्लोबिनची तीव्र कमतरता; जाणून घ्या आरोग्य समस्या आणि खबरदारी