नवी दिल्ली- केंद्र सरकारने दिवाळीच्या तोंडावर केंद्रीय कर्मचाऱ्यांना खूश केले आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तीन टक्के वाढ करण्यात आली आहे. या निर्णयाची माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली. अनुराग ठाकूर म्हणाले, की केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 1 जुलै 2021 पासून वाढ होणार आहे. त्याचा फायदा पेन्शन घेणाऱ्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांनाही होणार आहे. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा 28 टक्क्यांवरून 31 टक्के करण्यात येणार आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले, की महागाई भत्त्यातील वाढीचा केंद्र सरकारच्या 47.14 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. तर पेन्शन घेणाऱ्या 68.72 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे.