बिजनौर (उत्तर प्रदेश) :उत्तर प्रदेशातील बिजनौरमध्ये कोटवाली नदीच्या पाण्याच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे नदीचे पाणी रस्त्यापर्यंत पोहोचले आहे. शनिवारी हरिद्वारकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणी आल्याने उत्तर प्रदेश रोडवेजची एक बस पुराच्या पाण्यात अडकली. त्यामुळे एकच गोंधळ उडाला होता.
बसमध्ये सुमारे 50 प्रवासी होते : बस चालकाला पाण्याचा अंदाज न आल्याने ही बस पाण्याच्या जोरदार प्रवाहात अडकली. त्यानंतर बसमधील प्रवाशांनी आरडा - ओरड करण्यास सुरुवात केली. बसमध्ये सुमारे 50 प्रवासी होते. काही प्रवासी बसच्या छतावर उभे राहून वाचवण्याची विनंती करत होते. काही वेळाने बचाव पथकाची एक टीम तेथे पोहोचली. त्यांनी पुलाच्या वर क्रेन लावून बसला पलटी होण्यापासून रोखले. त्यानंतर बचाव पथकाने सर्व प्रवाशांना पुराच्या पाण्यातून सुखरुप बाहेर काढले.
प्रवाशांना जेसीबी मशीनच्या सहाय्याने रेस्क्यू केले : प्रदेशातील डोंगळात भागात सुरू असलेल्या पावसामुळे सर्वच नद्यांना पूर आला आहे. बिजनौरच्या कोटवाली नदीलाही उधाण आले आहे. शनिवारी नदी ओलांडत असताना प्रवाशांनी भरलेल्या बससोबत ही घटना घडली. बसमधील सर्व प्रवासी उत्तराखंडचे रहिवासी होते. ही बस बिजनौरच्या नजीबाबाद आगारातून शनिवारी सकाळी आठच्या सुमारास हरिद्वारला रवाना झाली होती. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या सीमेवर असलेल्या कोटावाली नदीला पुर आल्याने तेथून जाणारी बस अचानक पाण्यात अडकली. घटनेची माहिती मिळताच हरिद्वार आणि बिजनौर येथून बचाव पथक तातडीने घटनास्थळी पोहचले. त्यांनी जेसीबी मशीनच्या सहाय्याने सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले.