मऊ (उ. प्रदेश) : उत्तर प्रदेशच्या मऊ जिल्ह्यातील जहांगीराबादमध्ये माफिया मुख्तार अन्सारी, त्याचा आमदार पुत्र अब्बास अन्सारी आणि त्याचा लहान मुलगा उमर अन्सारी यांच्या अवैध घरावर शनिवारी बुलडोझर चालवला गेला. जिल्हा प्रशासनाने शुक्रवारपासूनच पाडकामाला सुरुवात केली होती. यंत्रातील बिघाडामुळे रात्री उशिरा काम अपूर्ण राहिले. त्यामुळे शनिवारी नवीन मशीन मागवून घर पाडले जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणी आदेशा दिल्यानंतर ही कारवाई केली जात आहे.
शक्तिशाली मशिन्स मागवल्या : शहर दंडाधिकारी नितीश कुमार सिंह यांनी सांगितले की, संपूर्ण घर अद्याप जमीनदोस्त झालेले नाही. त्यामुळे जेसीबीच्या आणखी काही शक्तिशाली मशिन्स घटनास्थळी बोलवण्यात आल्या आहेत. घर पाडण्याचे काम सुरू झाले आहे. मुख्तार अन्सारी याने ही जमीन त्यांच्या आई रजिया बेगम यांच्या नावावर खरेदी केली होती. मुख्तार अन्सारी हयात असताना आईने वारसाहक्काने ते मुख्तार अन्सारीच्या दोन्ही मुलांच्या नावे केले होते. या जमिनीवर दुमजली घर आणि कार्यालय बांधण्यात आले. ते अब्बास अन्सारी आणि त्याचा मुलगा चालवत होता. नकाशा मंजूर न करताच या जमिनीवर बेकायदेशीरपणे इमारत उभारण्यात आली.