लखनऊ: एनडीआरएफ, अग्निशमन दल, पोलीस आणि लष्कराच्या जवानांनी रात्री उशिरापर्यंत बचाव मोहीम राबवून सुमारे 14 जणांना सुखरूप बाहेर काढले आहे. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेक जण दबले गेले असून यामध्ये लहान मुले, महिला आणि वृद्धांचा समावेश आहे. ढिगाऱ्यात अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. तसेच राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री देखील घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला आणि रुग्णालयात जाऊन डॉक्टरांना जखमींच्या उपचारात कोणतीही हलगर्जीपणा न करण्याच्या सूचना दिल्या.
घटनास्थळी बचावकार्य सुरू : मंगळवारी संध्याकाळी साडेसहा वाजता हजरतगंजमधील बहुमजली अलाया अपार्टमेंट कोसळली. अपार्टमेंट कोसळल्याने शेजारी राहणाऱ्या लोकांमध्ये घबराट पसरली होती. लोकांनी याबाबत अधिकाऱ्यांना माहिती दिल्यानंतर अनेक अधिकाऱ्यांनी घटनास्थळी बचावकार्य सुरू केले. अपार्टमेंटमध्ये 12 फ्लॅट असून, त्यात आठ ते 10 कुटुंबे राहत होते. अपघाताची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी अत्याधुनिक मशिन्सच्या सहाय्याने मोहीम राबवून लोकांना वाचविण्याचे आदेश दिले आहेत. यानंतर त्यांनी सिव्हिल हॉस्पिटल गाठले. त्याचवेळी एनडीआरएफ आणि इतर पथकांनी लोकांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. याशिवाय मुख्यमंत्र्यांचे सल्लागार अवनीश अवस्थी, लखनऊ महापालिका आयुक्त इंद्रजित सिंह यांच्यासह अनेक अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत.