नवी दिल्ली : 2023 चा अर्थसंकल्प सादर करताना, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मत्स्यपालनासाठी नवीन सबव्हेंशन योजना जाहीर केली आहे. पीएम मत्स्य संपदा योजनेंतर्गत सवलतीची योजना येईल. त्यासाठी 6000 कोटींची घोषणा करण्यात आली आहे. तरुण उद्योजकांना कृषी स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी कृषी निधीची निर्मिती करण्यात येणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. ग्रामीण भारतात कृषी स्टार्टअप्स निर्माण करण्यावर सरकारचा भर, भारताला बाजरीचे जागतिक केंद्र बनविण्यावर भर दिला जात आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन :अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की पोषण, अन्न सुरक्षा आणि शेतकऱ्यांच्या हिताची काळजी घेतली जाईल. भारतात अनेक प्रकारच्या धान्याची लागवड केली जाते. यामध्ये ज्वारी, बाजरी, गहू यांचा समावेश आहे. भारत सरकार भरड धान्याला प्रोत्साहन देत आहे. त्यासाठी नव्या तरतूदी जाहीर केल्या आहेत.
कृषी-स्टार्टअपला प्रोत्साहन :नवीन अर्थसंकल्पात कृषी कर्जाचे लक्ष्य 20 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव असल्याचे अर्थमंत्र्यांनी म्हटले आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, कृषी क्षेत्राशी संबंधित स्टार्टअपला प्राधान्य दिले जाईल. यासाठी, तरुण उद्योजकांद्वारे कृषी-स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी अॅग्रीकल्चर एक्सीलरेटर फंड तयार केला जाईल. यासोबतच पीएम आवास योजनेच्या निधीत ६६ टक्के वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता ७९ हजार कोटींचा निधी मिळणार आहे.