इंफाळ: मणिपूरच्या पश्चिम इंफाळ जिल्ह्यात सोमवारी सकाळी दोन सशस्त्र गटांमध्ये चकमक झाल्याचे वृत्त आहे. यावेळी झालेल्या चकमकीत तीन ठार तर चार जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. जिल्ह्यातील कांगचुप परिसरात ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी सांगितले की, जखमींना इंफाळ येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काकिंग जिल्ह्यातील सेरो येथे दोन गटांमध्ये झालेल्या गोळीबारात चार जण जखमी झाले आहेत. जखमी बीएसएफ जवान रंजीत यादव यांचा गोळी लागल्याने मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
संशयित कुकी अतिरेक्यांचा हल्ला :याआधी 3 जून रोजी रात्री बॉम्ब आणि शस्त्रास्त्रांनी सज्ज असलेल्या संशयित कुकी अतिरेक्यांनी इंफाळ पश्चिम जिल्ह्यातील दोन गावांवर हल्ला केल्याने किमान 15 लोक जखमी झाले होते. पोलीस अधिकार्यांनी सांगितले की, फयेंग आणि कांगचुप चिंगखॉंग गावात तैनात राज्य पोलीस आणि मणिपूर रायफल्सच्या जवानांनी प्रत्युत्तर दिले, ज्यामुळे दोन्ही बाजूंमधील चकमक झाली, जी चार तासांपेक्षा जास्त काळ चालली. अतिरेकी जवळच्या टेकड्यांकडे पळून गेले होते.