हैदराबाद - 26 जुलै 2021 रोजी कर्नाटकच्या राजकारणाने पुन्हा एकदा कुस बदलली. मुख्यमंत्री बी. एस. येदियुरप्पा ( B.S. yediyurappa) यांनी मागील 10 दिवसांपासून सुरू असलेल्या तर्क-वितर्काना पूर्णविराम देत आपल्या पदाचा राजीनामा राज्यपालांकडे सुपुर्द केला. 78 वर्षीय या लिंगायत नेत्याला निरोप देण्याआधी 15 मे 2018 ते 19 मे 2018 दरम्यान कर्नाटकात जे काही घडले ते जाणून घ्यावे लागेल.
15 मे 2018 रोजी कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला होता. कोणत्याही राजकीय पक्षास पूर्ण बहुमत मिळाले नव्हते. भारतीय जनता पक्ष 104 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला होता. काँग्रेसला 78 तर जनता दल (सेक्युलर) पक्षाला 37 जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर सर्वात मोठ्या पक्षाचा नेता म्हणून 17 मे 2018 रोजी बुकानाकेरे सिद्दलिंगप्पा येदियुरप्पा म्हणजे बी. एस. येदियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती.
स्पष्ट बहुमत नसल्याकारणाने दोनच दिवसात म्हणजे 19 मे रोजी 'येदि' यांनी विधानसभेत एक भावनिक भाषण करून आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर काँग्रेसच्या समर्थनावर एच. डी. कुमारस्वामी यांनी सरकार स्थापन केले होते. मात्र एक वर्षानंतर 2019 मध्ये काँग्रेसचे 14 आणि जेडी (एस)च्या तीन आमदारांनी बंडखोरी केली अन् कुमारस्वामींचे सरकार कोसळले. त्यावेळी अशी चर्चा सुरू होती, की येदियुरप्पा यांच्या नेतृत्वातच भाजपने ऑपरेशन लोटस (Operetion Lotus) राबवले व पुन्हा सत्ता हस्तगत केली.
येदियुरप्पा यांनी 26 जुलै 2019 रोजी चौथ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. बंडखोर आमदारांना अपात्र ठरवल्याने डिसेंबर महिन्यात पोटनिवडणुका झाल्या व भाजपने 12 जागांवर विजय मिळवून विधानसभेतील बहुमत पक्के केले. कर्नाटक विधानसभेत्या एकूण जागा 224 आहेत व बहुमतासाठी 113 आमदारांचा पाठिंबा आवश्यक आहे. राजकीय क्षेत्रात येदियुरप्पा 'बीएसवाय' (BSY) आणि 'येदि'( Yedi) या नावांनी प्रसिद्ध आहेत. 'बीएसवाय' अशी वेळी मुख्यमंत्री बनले जेव्हा त्यांच्या वयाच्या नेत्यांना पक्षाच्या सल्लागार समितीमध्ये पाठवले जात होते.
येदियुरप्पा यांना हायकमांडने 2018 मध्ये सीएम का बनवले ?
कर्नाटकच्या राजकारणात येदियुरप्पा यांचे मोठे वजन आहे. येदियुरप्पा यांनी 2008 मध्ये एकट्याच्या बळावर भाजपला सत्तेपर्यंत पोहोचवले होते. 2019 मध्ये 78 वर्षीय येदियुरप्पा यांना पर्याय ठरणार नेता भाजपकडे नव्हता. ऑपरेशन लोटस (Operetion Lotus) यशस्वी करून येदियुरप्पा यांनी आपली ताकद दाखवून दिली होती.
लिंगायत मुख्यमंत्री हटवणे भाजपसाठी कठीण -
येदियुरप्पा लिंगायत समाजाचे नेतृत्व करतात. राज्य सर्वाधिक 17 टक्के लोकसंख्या या समाजाची आहे. आतार्यंत आठ मुख्यमंत्री या समाजाने दिले आहेत. त्याचबरोबर राज्यात 120 120 विधानसभा मतदारसंघात या समाजाचा दबदबा आहे. लिंगायत समाज बीजेपी व येदियुरप्पा यांचा समर्थक आहे.
जेव्हा येदि यांना हटवण्याची चर्चा सुरू होती. त्यावेळी लिंगायत समाजाच्या लिंगेश्वर मंदिराचे मठाधीश शरनबासवलिंगा यांनी म्हटले की, निवडणुका कशा जिंकल्या जातात हे दिल्लीच्या लोकांना माहीत नाही. राज्यात येदियुरप्पा यांनी भाजपचे सरकार बनवले आहे. त्यामुळे त्यांना हटवणे भाजपला नुकसानकारण ठरू शकते. बीजेपीने 'बीएसवाई' विना 2013 मध्ये विधानसभा निवडणुका लढल्या होत्या. त्यावेळी भाजप आमदारांची संख्या 110 वरून 40 वर आली होती. त्यावेळी बी एस येदियुरप्पा यांच्या कर्नाटक जनता पक्षालाही केवळ आठ जागांवर विजय मिळाला होता.
येदियुरप्पा यांनी कर्नाटक जनता पक्षाची स्थापना का केली ? -
'येदि' 30 मे 2008 ला दुसऱ्यांदा कर्नाटकचे सीएम बनले होते. तीन वर्षापर्यंत त्यांचे सरकार विनातक्रार चालले. 2011 मध्ये लोकायुक्तने अवैध खान प्रकरणाची चौकशी सुरू केली. यामध्ये येदियुरप्पा यांचेही नाव आले. पक्षश्रेष्टींनी त्यांना राजीनामा देण्याचा आदेश दिला. त्यावेळी बीजेपीचे राष्ट्रीय अध्यक्ष होते नितीन गडकरी व त्यावेळी पक्षावर लाल कृष्ण आडवाणी यांचा पगडा होता.
लोकसभा निवडणुकीची तयारी करताना भाजपला कोणत्याही प्रकारचा वाद नको होता. त्यामुळे येदियुरप्पा यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढवण्यात आला. येदियुरप्पा यांनी 31 जुलै 2011 मध्ये भाजपचा राजीनामा दिला व 30 नोव्हेंबर 2012 रोजी कर्नाटक जनता पक्ष नावाने स्वत:चा पक्ष स्थापन केला. यामुळे भाजप व 'येदि' दोघांचेही नुकसान झाले.