आदिलाबाद (तेलंगणा) :तेलंगणातील सत्ताधारी तेलंगणा राष्ट्र समितीचे भारत राष्ट्र समिती असे नामांतरण झाल्यानंतर या पक्षाने प्रथमच दुसऱ्या राज्यात निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. भारत राष्ट्र समितीने महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढविण्याचा निर्णय घेतला आहे. या निवडणुकांवरून बीआरएसचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री केसीआर यांनी आदिलाबाद जिल्ह्याचे सरकारी व्हिप बलका सुमन, आमदार जोगू रामण्णा, माजी खासदार गोडम नागेश आणि इतर राज्यांच्या नेत्यांसोबत रविवार आणि सोमवारी प्रगती भवन येथे बैठक घेतली. मंगळवारी रात्री त्यांनी पुन्हा नेत्यांशी संवाद साधला
झेडपी आणि पंचायत समितीच्या निवडणूका लढणार : या प्रदीर्घ चर्चेत महाराष्ट्रात झेडपी सदस्य (झेडपीटीसी) आणि पंचायत समिती सदस्य (एमपीटीसी) निवडणूक लढविण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. एका पंचायत समितीच्या अखत्यारीत तीन झेडपीटीसी आणि सहा एमपीटीसीपर्यंत जागा असल्याचं कळतं. त्यामुळे सर्वच ठिकाणी निवडणूक लढवण्याची चर्चा झाली आहे. झेडपीच्या अध्यक्षांची निवड झेडपीटीसीकडून होणार असल्याने ही निवडणूक महत्त्वाची मानून हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे.
जिल्हा प्रभारींची नियुक्ती : तेलंगणातील भारत राष्ट्र समितीच्या नेत्यांना महाराष्ट्रातील जिल्ह्यांचे प्रभारी म्हणून नियुक्त केले जाईल. आदिलाबादचे आमदार जोगू रामण्णा आणि माजी खासदार गोडम नागेश यांची आदिलाबादला लागून असलेल्या महाराष्ट्रातील यवतमाळ, वर्धा आणि वाशिम जिल्ह्यांचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या दोघांनाही या तीन जिल्ह्यांमध्ये नियमित ये - जा करावी लागणार आहे. आधी प्रत्येकाला एका जिल्ह्याची जबाबदारी देण्यात येणार होती, मात्र शेवटी त्यांना दोन - तीन जिल्ह्यांची जबाबदारी दिली गेली आहे.