फर्रुखाबाद -अंगुठाछाप नवरदेवासोबत लग्न करण्यास वधुने नकार दिल्याने वरात सरळ पोलीस ठाण्यात धडकली. मात्र तिथेही यावर काहीच तोडगा न निघाल्याने वराला हात हलवत परत यावे लागल्याची घटना गुरुवारी मोहम्मदाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दुर्गापूर गावात घडली. बिछमा येथील बबीना सारा असे त्या रिकाम्या हाताने परतलेल्या नवरदेवाचे नाव आहे. पोलीस ठाण्यात बराच वेळ पंचायत भरवूनही कोणताच तोडगा न निघाल्याने झालेला खर्च आपला आपण करायचा असे ठरवूनच वरात परतल्याची माहिती पोलीस निरीक्षक कामता प्रसाद यांनी दिली. मात्र याबाबत आता मोठी चर्चा रंगली आहे.
संशय आल्याने दिले पैसे मोजायला :गुरुवारी सायंकाळी दाखल झालेल्या वरातीतील नागरिक पंगतीत जेवण करत होते. तर दुसरीकडे रात्री बारा वाजता द्वारचाराचा कार्यक्रम सुरू होता. यावेळी वधुच्या भावाला मुलगा अडाणी असल्याचा संशय आला. त्यामुळे वधुच्या भावाने पंडीताला पैसे देऊन हे पैसे नवरदेवाला मोजायला सांगितले. त्यामुळे मंगलकार्य करणाऱ्या पंडिताने नवरदेवाला पैसे मोजायला सांगितले. मात्र नवरदेवाला दिलेल्या 10 च्या नोटाही मोजता आल्या नाहीत. त्यामुळे त्याला पैसे मोजता न आल्याची बाब नवरीच्या भावाने नवरीसह त्याच्या वडिलांना सांगितली. त्यामुळे नवरीने हा माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे, अडाण्यासोबत लग्न करु शकत नसल्याचे सांगितले. त्यामुळे अधिकतर वरातीत आलेल्या नागरिक परत गेले.
नागरिकांनी बोलावले पोलीस :नवरीने लग्न करायला नकार दिल्यामुळे वराकडील नातेवाईकांचा संताप झाला. त्यामुळे त्यांनी ही बाब पोलीस ठाण्यात कळवली. पोलीस ठाण्यात प्रकरण गेल्यामुळे पोलीस निरीक्षक कामता प्रसाद यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यांनी दोन्ही पक्षाकडील नागरिकांची पंचायत बसवली. अनेक तास पंचायत सुरू होती. मात्र त्यानंतरही कोणताच तोडगा निघाला नाही. त्यामुळे दोन्ही पक्षाकडील नागरिकांनी आपापल्या घरी जाण्याचा निर्णय घेतला. लग्नावर झालेल्या खर्चाची रक्कम कोणीच कोणाला द्यायची नाही, असेही त्यांनी ठरवले. त्यामुळे आलेली वरात रिकाम्या हाताने परतली.