भागलपूर (बिहार) : लग्न हा कोणाच्याही आयुष्यातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय असतो. म्हणूनच म्हणतात की लग्नाचा निर्णय खूप काळजीपूर्वक घेतला पाहिजे. लग्न हे सात जन्मांचे अतूट बंधन मानले जाते. त्याचबरोबर अशा अनेक मुली आहेत ज्यांच्यासाठी लग्न म्हणजे आयुष्यभराची शिक्षा ठरते. अनेक वेळा असे दिसून येते की, गरिबीमुळे आई - वडील हुंडा देऊ शकत नसल्यामुळे आपल्या मुलीला कोणाच्याही स्वाधीन करून त्यांच्यावरचे ओझे उतरवायला पाहतात. पण कधी कधी मुली योग्य वेळी आवाजही उठवतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वराला स्टेजवर पाहून वधूला राग आला आणि तिने लग्न करण्यास स्पष्ट नकार दिला.
वधूने लग्नास नकार दिला : प्रकरण भागलपूर जिल्ह्यातील कहालगावच्या रसालपूर गावातील आहे. विनोद मंडल यांची मुलगी किट्टू कुमारी हिचा विवाह धनौरा येथील रहिवासी डॉ. वीरेंद्र सिंह यांचा मुलगा नीलेश कुमार सिंग याच्याशी होणार होता. हे आनंदाचे क्षण आपल्या मोबाईलमध्ये कैद करण्यात वधू पक्ष आणि वधू पक्षाचे लोक मग्न होते. दरम्यान, मंचावर वधू किट्टू कुमारीने वराच्या गळ्यात हार घालण्यास आणि टिळक लावण्यास स्पष्ट नकार दिला. तिला मनवण्याचे प्रयत्न चालू राहिले पण वधू राजी झाली नाही. यानंतर मुलाच्या कुटुंबीयांनी मुलीच्या कुटुंबीयांना बरेच काही सुनावले, परंतु तरीही वधू आपल्या निर्णयावर ठाम राहिली. त्यानंतर वर पक्षाला वधूशिवाय परतावे लागले.
वराचे अधिक वय आणि सावळ्या रंगामुळे नकार : सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये असे दिसून येते की वधूने तिच्या भावी पतीला स्टेजवर पाहताच तिचा चेहरा फिका पडतो. रागावलेली वधू लग्नाला स्पष्टपणे नकार देते. त्यानंतर सर्वजण मुलीला लग्न न करण्याचे कारण विचारतात. मुलीने यामागचे कारण सांगितले की, वराचे वय अधिक असून तो सावळ्या रंगाचा आहे.