टोकियो:रशियाविरुद्ध कडक निर्बंध आणि सततच्या वाढत्या मागणीमुळे ब्रेंट क्रूड तेलाच्या किमती प्रति बॅरल 10 डॉलरपेक्षा जास्तने वाढल्या आहेत. त्याचा परिणाम शेअर बाजारावरही दिसून येत आहे. सोमवारी शेअर बाजारात (Falling stock market) मोठी घसरण झाली. भारतात सोमवारी बीएसई 1,600 हून अधिक अंकांनी घसरला.
सोमवारी सकाळी ब्रेंट क्रूड ऑइलची किंमत सुमारे 10 डाॅलर पेक्षा जास्तने वाढली. आता कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल सुमारे 130 डाॅलरवर गेली आहे. रशियावर कठोर निर्बंध घालण्याच्या वाढत्या आवाहनामुळे युक्रेनमधील संघर्ष अधिक तीव्र होत आहे. विशेष म्हणजे रशिया हा जगातील दुसरा सर्वात मोठा तेल उत्पादक देश आहे. अशा परिस्थितीत रशियाकडून पुरवठ्यात अडथळा निर्माण झाला तर भाव वाढतील. दरम्यान, लिबियाच्या राष्ट्रीय तेल कंपनीने सांगितले की, एका सशस्त्र गटाने दोन महत्त्वाचे तेल क्षेत्र बंद केले आहे, ज्यामुळे तेलाच्या किमती वाढल्या आहेत.