श्रीनगर :जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला भागात असणाऱ्या पट्टन सिंगपोरामध्ये ग्रेनेड हल्ला झाला आहे. या हल्ल्यात सहा नागरिक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हा हल्ला दहशतवाद्यांनीच केला असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
सुरक्षा अधिकारी होते निशाण्यावर..
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली. पट्टन भागातील सिंगपोरा बाजारात हा हल्ला करण्यात आला. याठिकाणी तैनात असणाऱ्या सुरक्षा अधिकाऱ्यांवर हा हल्ला करण्यात आला. मात्र, निशाणा चुकल्यामुळे रस्त्यावरच हा ग्रेनेड फुटला. यामध्ये सहा ते सात नागरिक जखमी झाले.
दहशतवाद्यांचा शोध सुरू..
या सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच, हा संपूर्ण परिसर सील करण्यात आला असून, दशतवाद्यांचा शोध घेणे सुरू असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली. या हल्ल्यानंतर श्रीनगर-बारामुल्ला महामार्गावरील वाहतूकही काही काळासाठी थांबवण्यात आली होती.
यापूर्वी १९ नोव्हेंबरला अशाच एका दहशतवादी हल्ल्यात १२ नागरिक जखमी झाले होते. पुलवामामध्ये हा हल्ला झाला होता.
हेही वाचा :जम्मू काश्मीर : पुलवामामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा; पहाटेपासून सुरु आहे चकमक