नवी दिल्ली : दिल्लीतून पुन्हा एकदा प्रेमाचा रक्तरंजित अंत झाल्याची घटना समोर आली आहे. हे प्रकरण दिल्लीतील करावल नगर भागातील आहे. येथे एका तरुणावर लग्नाच्या दबावामुळे आपल्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या केल्याचा आरोप आहे.
गळा दाबून खून केला : ईशान्य दिल्लीचे डीसीपी डॉ. जॉय तिर्की यांनी सांगितले की, 12 एप्रिलच्या रात्री कृष्णा पब्लिक स्कूलजवळ एका महिलेचा मृतदेह आढळल्याचा फोन करवल नगर पोलिस स्टेशनला आला होता. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून अंदाजे 25 वर्षीय महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला. तिच्या शरीरावर कोणतीही स्पष्ट जखम दिसत नव्हती. मृतदेह जीटीबी रुग्णालयात नेण्यात आला. तेथेही डॉक्टरांना शरीरावर कोणतीही स्पष्ट जखम आढळली नाही. रोहिना नाज उर्फ माही असे मृत महिलेचे नाव आहे. 15 एप्रिल रोजी जीटीबी रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर तिचा गळा दाबल्याने मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
सीसीटीव्हीने आरोपीची ओळख : यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरे तपासले, ज्यामध्ये मोटारसायकलवरील दोन लोक संशयास्पदरित्या फिरताना आढळले. त्या दोघांच्या मध्ये एक महिला बसली होती. कॅमेऱ्यांचे रिझोल्यूशन खराब असल्याने मोटरसायकलचा क्रमांक स्पष्ट दिसत नव्हता. सीसीटीव्ही कॅमेरे स्कॅन करण्यासाठी 4 वेगवेगळ्या टीम तयार करण्यात आल्या होत्या. या पथकांनी मोटारसायकलवरून आलेल्या गुन्हेगारांचा सुमारे 12-13 किलोमीटर अंतरापर्यंत मजला बाजार तेलीवाडा परिसरात शोध घेतला. शेवटी 20 एप्रिल रोजी, पोलिस पथकांना एक सीसीटीव्ही फुटेज मिळाले, ज्यामध्ये एक पट्टेदार टी-शर्ट घातलेला माणूस मुलीचा मृतदेह खांद्यावर घेऊन जात आहे आणि एक महिला त्याच्या मागे चालत आहे, असे दिसले. सीसीटीव्हीमध्ये दिसलेल्या दोघांची ओळख विनीत आणि त्याची बहीण पारुल अशी झाली आहे.
आरोपी महिलेला अटक : पोलीस या दोघांना अटक करण्यासाठी गेले असता त्यांच्या घराला कुलूप आढळून आले. विनीत गेल्या काही दिवसांपासून दिसत नव्हता तर पारुलने 20 एप्रिललाच घर सोडल्याचे कळाले. तिने आपले सामान आणि दोन मुलांसह शिफ्ट करण्यासाठी घोड्याचा टांगा वापरला होता. विनीतचे गाव बागपतमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि एक टीम तात्काळ बागपतला रवाना झाली. त्याचवेळी पोलिसांच्या दुसऱ्या पथकाने सीसीटीव्हीत दिसणाऱ्या घोड्याच्या टांग्याचा माग काढला आणि घोड्याचा मालकाला पकडले. चौकशीदरम्यान त्याने पारुलला ज्या घरात सोडले होते, त्याची माहिती पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी पारुलला कृष्णा नगर येथील घरातून अटक केली.