नवी दिल्ली Modi Lakshadweep Post :मालदीवमधील एका मंत्र्यानं भारताविरुद्ध केलेल्या वादग्रस्त टिप्पण्यांनंतर दोन देशांमध्ये सध्या तणावाचं वातावरण आहे. या वादानंतर सोशल मीडियावर #BoycottMaldives हा ट्रेंड सुरू झाला. यानंतर अनेक भारतीयांनी आपल्या मालदीवच्या ट्रीप रद्द केल्या असून तेथील हॉटेल बुकिंगमध्ये मोठी घट झाली आहे.
मोदींची लक्षद्वीपबाबत पोस्ट : सोशल मीडियावर सध्या एका ठिकाणाची फारच चर्चा आहे. हे ठिकाण म्हणजे अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच या बेटांना भेट दिली होती. मोदींनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये ते लक्षद्वीपमध्ये स्नॉर्केलिंग करताना, पांढऱ्या वाळूवर चालताना आणि समुद्रकिनाऱ्यावर विश्रांती घेताना दिसत आहेत. त्यांच्या या पोस्टनंतर लोकांमध्ये या बेटांबाबत कुतूहल निर्माण झालं. मोदींची ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर लक्षद्वीप हा भारतात गुगलवर सर्वाधिक शोधला जाणारा 10वा शब्द बनलाय.
मालदीवच्या खासदाराची वादग्रस्त टिप्पणी : मोदींच्या पोस्टनंतर नेटिझन्सनी लागलीच लक्षद्वीपची तुलना मालदीवशी करण्यास सुरुवात केली. मालदीवप्रमाणेच लक्षद्वीप देखील सुट्टीसाठी एक चांगलं ठिकाण असू शकतं, अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. मात्र भारतीय बेटाची ही वाढती लोकप्रियता मालदीवच्या एका खासदाराला भावली नाही. मालदीवचे खासदार जाहिद रमीझ यांनी पंतप्रधान मोदींच्या लक्षद्वीप भेटीवर प्रतिक्रिया देताना एक वादग्रस्त टिप्पणी केली. (भारतीयांच्या) हॉटेलच्या खोल्यांमध्ये कायमचं वास असतो अशा आशयाची त्यांची टिप्पणी होती.
मालदीवला लक्ष्य केल्याचा आरोप : या व्यतिरिक्त, मालदीवचे आणखी एका मंत्री अब्दुल्ला महझूम माजिद यांनी भारतावर मालदीवला लक्ष्य केल्याचा आरोप केला आहे. आमच्या रिसॉर्टच्या पायाभूत सुविधा त्यांच्या बेटापेक्षा (लक्षद्वीप) चांगल्या आहेत. बीच पर्यटनात मालदीवशी स्पर्धा करण्यासाठी भारताला मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागेल, अशा आशयाची पोस्ट या मंत्र्यानं केली. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये पंतप्रधान मोदींना टॅग करत, ही तुमची संस्कृती आहे, अशी टीका केली होती.
नेटिझन्सन्सची तीव्र प्रतिक्रिया : मालदीवच्या मंत्र्याच्या या पोस्टनंतर मोठा वाद निर्माण झाला, ज्यानंतर त्यांनी लगेच ही पोस्ट डिलिट केली. नेटिझन्सन्सच्या तीव्र प्रतिक्रियेनंतर त्यांनी आपलं सोशल मीडिया अकाऊंटही डिलिट केलं. भारतातील युजर्सनी मात्र मालदीवच्या राजकारण्यांना यावरून चांगलंच फटकारलंय. बॉलीवूड स्टार अक्षय कुमार तसेच भारताचे माजी क्रिकेटपटू व्यंकटेश प्रसाद यांच्यासह अनेक नामांकित व्यक्तींनी या टीकेवर प्रतिक्रिया दिली आहे.
अक्षय कुमारची पोस्ट : "मालदीवमधील प्रमुख सार्वजनिक व्यक्तींकडून भारतीयांबद्दल द्वेषपूर्ण आणि वर्णद्वेषी टिप्पण्या आल्या. आश्चर्य वाटले की ते अशा देशाबद्दल बोलत आहेत जेथून त्यांच्या देशात जास्तीत जास्त पर्यटक येतात. आम्ही आमच्या शेजाऱ्यांशी चांगलं वागतो, मात्र आम्ही असा अकारण द्वेष का सहन करायचा? मी अनेक वेळा मालदीवला भेट दिली आहे आणि नेहमीच त्याची प्रशंसा केली आहे. मात्र आता आपण #ExploreIndianIslands आणि स्वतःच्या पर्यटनाला पाठिंबा देण्याचं ठरवूया," अशी पोस्ट अक्षय कुमारनं केली.
हे वाचलंत का :
- 'लक्षद्वीपला जाऊन स्वतःचे फोटो काढतात, हे महापुरुष मणिपूरला का जात नाहीत?' खरगेंचा मोदींना खोचक सवाल