बलिया :बलिया येथील फाफना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मालदेपूर येथे सोमवारी पहाटे बोटीचा अपघात (बोट पलटी) झाला. यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला. मुंडन संस्कारादरम्यान सुमारे 40 लोक एका छोट्या बोटीत बसून गंगा नदीच्या दुसऱ्या टोकाला प्रार्थना करण्यासाठी जात होते. त्यात बुडणाऱ्या नागरिकांचा आरडाओरडा ऐकून अनेक मच्छीमारांनी बचावासाठी नदीत उडी घेतली.
लोकांना वाचवण्यासाठी बचावकार्य सुरू : बुडणाऱ्या काही लोकांना स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने तातडीने बाहेर काढण्यात आले. गंगा नदीत अनेक नागरिक बुडाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच अनेक पोलीस ठाण्यांचे कर्मचारी आणि बचाव पथकाचे जवान गंगा नदीच्या काठावर पोहोचले. त्यांच्या मदतीने इतर लोकांना बाहेर काढण्यात आले. अनेकांना बेशुद्ध अवस्थेत जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. आतापर्यंत जिल्हा रुग्णालयातील आपत्कालीन कक्षात चार महिलांचा बुडून मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. त्याचबरोबर एका तरुणाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. लोकांना वाचवण्यासाठी बचावकार्य सुरू असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता :बलियातील बोटीचा अपघात मालदेपूर घाट येथे घडला. बोटीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्याने हा अपघात घडल्याचे बोलले जात आहे. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघाताची माहिती प्रथम स्थानिकांना समजली. काही लोकांना पोहता येत होते. तर काही लोकांचे प्राण वाचले. 24 जण अद्याप बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.