मुंगेर (बिहार) :बिहारच्या भागलपूरहून दिल्लीच्या आनंद विहारकडे जाणाऱ्या विक्रमशिला ट्रेनमध्ये गुरुवारी स्फोट झाला. ही घटना घडली तेव्हा ट्रेन जमालपूर रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर उभी होती. रेल्वेच्या एस - 9 बोगीत झालेल्या स्फोटात संदीप कुमार हा 20 वर्षीय तरुण जखमी झाला आहे. संदीप कुमार भागलपूर जिल्ह्यातील हवेली खरगपूर भलवाई या गावचा रहिवासी आहे. हा स्फोट कसा झाला, याबाबत तपास सुरू आहे. मात्र एका प्रवाशाच्या मोबाईलचा स्फोट झाल्याचे रेल्वे अधिकारी, रेल्वे पोलीस आणि ट्रेनमधील प्रवाशांचे मत आहे.
स्फोटानंतर ट्रेनमध्ये गोंधळ उडाला : संदीप कुमारने सांगितले की, तो आनंद विहारला जाण्यासाठी बरियारपूरहून एस - 9 बोगीत चढला होता. त्यावेळी ट्रेनमध्ये बरीच गर्दी होती. त्यामुळे तो बोगीच्या गेटजवळ उभा होता. थोड्या वेळाने ट्रेन जमालपूर स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर थांबली. ट्रेन थांबताच एका महिलेच्या बॅगेतून अचानक धूर येऊ लागला आणि त्यानंतर अचानक मोठा स्फोट झाला. या स्फोटानंतर ट्रेनमध्ये एकच गोंधळ उडाला. स्फोटाच्या धक्क्याने तो तरुण ट्रेनच्या गेटजवळ पडला. स्फोटानंतर महिलेच्या बॅगेला आग लागली. या आगीच्या कचाट्यात संदीप सापडला. या घटनेत तो गंभीर जखमी झाला असून, आगीमुळे त्याचा पाय गंभीररित्या भाजला आहे.