नवी दिल्ली :भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची दोन दिवसीय बैठक १६ जानेवारीपासून राजधानीतील नवी दिल्ली नगरपरिषदेच्या कन्व्हेन्शन सेंटरमध्ये होणार आहे. या महत्त्वाच्या संघटनात्मक बैठकीत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा कार्यकाळ वाढवला जाऊ शकतो. यासोबतच विधानसभा आणि सार्वत्रिक निवडणुकीसाठी पक्षाच्या रणनीतीवरही चर्चा होणार आहे. नड्डा यांचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून तीन वर्षांचा कार्यकाळ या महिन्यात संपत आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत ते पक्षाचे नेतृत्व करू शकतात. सोमवारी राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक सुरू होण्यापूर्वी पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी पटेल चौक ते एनडीएमसी कन्व्हेन्शन सेंटर असा रोड शो आयोजित केला आहे.
ठराव पारित करण्यात येणार :दुपारी ४ वाजता कार्यकारिणीची बैठक सुरू होईल. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा उद्घाटन सत्राला संबोधित करतील आणि दुसऱ्या दिवशी पंतप्रधान मोदींच्या भाषणाने त्याची सांगता होईल. पत्रकारांना संबोधित करताना भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे म्हणाले की, पंतप्रधान मोदी आणि भाजप अध्यक्ष नड्डा यांच्या व्यतिरिक्त, पक्षशासित राज्यांचे 12 मुख्यमंत्री आणि पाच उपमुख्यमंत्री, 35 केंद्रीय मंत्री, 17 राज्यांमधील पक्षाचे नेते, सुमारे 350 कार्यकारिणीच्या बैठकीत नेते सहभागी होतील. बैठकीत राजकीय, आर्थिक, सामाजिक ठराव पारित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यकारिणीच्या बैठकीपूर्वी सोमवारी सकाळी भाजप मुख्यालयात पक्षाचे राष्ट्रीय पदाधिकारी, सर्व राज्यांचे अध्यक्ष आणि महामंत्री, संघटनेचे मंत्री यांची बैठक होणार आहे. या बैठकीत कार्यकारिणीचा अजेंडा निश्चित केला जाणार आहे.