नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील भाजपने नामनिर्देशित केलेल्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आज शुक्रवारी (दि. 24 जुन)रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह वरिष्ठ नेते उपस्थित होते.
भाजपने आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री असलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह त्यांच्या सर्व मित्रपक्षांना नामांकन समारंभात सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, नॅशनल पीपल्स पार्टी (NCP) प्रमुख आणि मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड संगमा आणि नागालँडचे मुख्यमंत्री नेफियू रिओ यांनी शुक्रवारी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी नामांकनात आपला सहभाग निश्चित केला आहे. नामांकनावेळी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे देखील उपस्थित राहणार असल्याचे बोलले जात आहे.
बुधवारी संध्याकाळीओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी ओडिशाच्या सर्व आमदारांना मुर्मू यांच्या उमेदवारीला पाठिंबा देण्याचे आवाहन केले. विशेष म्हणजे, नवीन पटनायक यांच्या नेतृत्वाखालील बिजू जनता दल (BJD) हा एनडीएचा सहयोगी नाही. परंतु, अनेकदा महत्त्वाच्या विधेयकांवर आणि विधानसभेवर (NDA) सरकारला पाठिंबा देताना दिसतो. 18 जुलै रोजी होणार्या आगामी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी त्यांनी उघडपणे मुर्मू यांच्या उमेदवारीला दुजोरा दिला आहे.