कोलकाता - यंदा पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचा बार उडणार आहे. येत्या काही दिवसातच निवडणुकीच्या तारखांची घोषणा होण्याची शक्यता आहे. सत्तेत येण्यासाठी भाजपाकडून जोरदार तयारी सुरू आहे. भाजपनं राज्यात 'सोनार बांग्ला' मोहिमेचीही सुरुवात केलीय. यात जनतेकडून जवळपास 2 कोटी सूचना मागवण्यात येत आहेत.
बंगालच्या विकासासाठी काम करण्याची इच्छा आहे. बंगालचे सोनार बांग्लामध्ये रुपांतर करायचे आहे. त्यामुळे तुमच्या सर्वांच्या सूचनांची गरज आहे. तुमच्या सुचनांनुसार निवडणुकीसाठी जाहीरनामा तयार करण्यात येणार आहे, असे भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी सांगितले. संपूर्ण बंगालमध्ये 30 हजार सूचना पेट्या लावण्यात येणार आहेत. ही मोहीम 3 मार्च ते 20 मार्चपर्यंत सुरू राहणार आहे.
आतापर्यंत 40 कोटी लोकांचे जनधन खाते उघडण्यात आले आहेत. बंगालमध्ये 1.92 कोटी लोकांचे जनधन खाते उघडली आहेत. या खात्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500-500 रुपये मदत निधी थेट त्यांच्या खात्यात टाकला, असेही त्यांनी सांगितले.