कोलकाता - काही दिवसापूर्वी पार पडलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीला ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाने भारतीय जनता पक्षाचा धुव्वा उडवत सत्ता काबीज केली. निवडणुकीत भाजपाच्या पराभवानंतर पक्षात मोठा गोंधळ उडालेला आहे. भाजपाचा पराभव झाल्यानंतर तृणमूलमधून आलेले अनेक नेते उघडपणे घरवापसीबद्दल बोलू लागले आहेत. काही कार्यकर्त्यांनी टीएमसीची चक्क सार्वजनिकरित्या लाउडस्पीकरवरून माफी मागितली आहे.
तृणमूल काँग्रेसला रामराम ठोकत भाजपात प्रवेश केलेल्या बीरभूम जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सार्वजनिकरित्या माफी मागितली आहे. भाजपात प्रवेश करून चूक झाली, आता परत तृणमूलमध्ये येण्याची इच्छा आहे, अशी माफी टीएमसीचे भाजपात सामील झालेले कार्यकर्ते मागत आहेत.
भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष ध्रुव सारा यांनी यावर प्रतिक्रिया दिली असून कार्यकर्ते घाबरलेले आहेत. त्यामुळे ते असे करत आहेत. लोकशाहीसाठी ही एक शरमेची बाब आहे. लोकांचे अधिकार हिसकावण्यात येत आहेत. आमचे कार्यकर्ते टीएमसीला घाबरत आहेत. सार्वजनिक रित्या माफी मागण्यासाठी त्याच्यावर जबरदस्ती करण्यात आली आहे, असे ध्रुव सारा म्हणाले.
अनेक कार्यकर्त्यांची घरवापसीची इच्छा...
सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने तिकिट नाकारल्यानंतर टीएमसीच्या अनेक नेत्यांनी भाजपाचा हात धरला होता. मात्र, भाजपमध्ये जाण्याच्या चुकीचा निर्णय होता, असे म्हटलं आहे. तसेच त्यांनी तूणमूलमध्ये परत येण्याची इच्छा व्यक्त केली. या नेत्यांमध्ये सोनाली गुहा, उत्तर दिनाजपूरचे आमदार अमोल आचार्य, मालदा जिल्हा परिषद सदस्य सरला मूर्मू, दीपेंदू बिश्वास यांचा समावेश आहे.