गांधीनगर/शिमला - संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या गुजरात (Gujarat Election Result 2022) व हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीचा (Himachal Pradesh Result 2022) निकाल आज जाहीर झाला आहे. गुजरातमध्ये सलग सातव्यांदा भाजपाचे सरकार येणार असल्याचे निश्चित झाले आहे. भाजपाने ऐतिहासिक कामगिरी केली असून 182 पैकी 156 जागा जिंकल्या आहेत. काँग्रेसचा मात्र दारुण पराभव झाला आहे. काँग्रेसला फक्त 17 जागांवर विजय मिळवला आहे. तर तिकडे हिमाचलमध्ये मात्र भाजपचा पराभव झाला आहे. तर काँग्रेसने आता तिथे सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरू केल्या आहेत.
गुजरातमध्ये काँग्रेसचे विरोधीपक्ष नेते पदही जाणार - गुजरात विधानसभेच्या 182 जागा आहेत. विरोधीपक्ष पदासाठी कमीतकमी 10 टक्के जागा निवडून येणे अनिवार्य आहे. विरोधी पक्ष नेतेपदासाठी गुजरातमध्ये कमीतकमी 18 जागा हव्या आहेत. पण सध्याच्या आकडेवारीवरुन काँग्रेसला 17 जागा मिळाल्या आहेत. 2017 मध्ये झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला 77 जागा मिळाल्या होत्या.