नवी दिल्ली - पश्चिम बंगामध्ये विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजलं आहे. पश्चिम बंगालमध्ये कमळ फुलविण्यासाठी भाजपने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी प्रचारसभा, कॉर्नर बैठका आणि रथ यात्रा सुरू करण्यात आल्या आहेत. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान कोलकाता दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी राज्यात भाजपाचे सरकार येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. '2 मई दीदी गई, बीजेपी आई'(2 मे दीदींचे सरकार पडणार आणि भाजपा राज्यात सरकार स्थापनार), अशी नवी घोषणा शिवराज सिंह चौहान यांनी केली.
काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या युतीने राज्याची वाईट परिस्थिती केल्यानंतर दीदींनी ती आधिकच बिकट केली आहे. तृणमूल काँग्रेसविरोधात लाट आली असून सत्ता बदल होणार आहे. तृणमूल काँग्रेसने राज्यातील शेतकऱ्यांना केंद्राच्या योजनेचा फायदा घेऊ दिला नाही. राज्यात भष्ट्राचार आणि हिंसाचार वाढला आहे, असे ते म्हणाले.
पश्चिम बंगाल ही पवित्र भूमी आहे. जिथे श्री रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद यांचा जन्म झाला. या भूमीत बराच हिंसाचार झाला आहे. आतापर्यंत 130 भाजप कार्यकर्त्यांनी आपले बलिदान दिले आहे आणि हे बलिदान व्यर्थ ठरणार नाही. टीएमसीचा खरा अर्थ 'तोडो, मारो और काटो' आहे, अशी टीका त्यांनी केली.