नवी दिल्ली:कर्नाटक विधानसभा निवडणूक २०२३ साठी उमेदवार निश्चित करण्याकरिता भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची ९ एप्रिल रोजी पक्ष कार्यालयात बैठक होऊ शकते. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजपचे सरचिटणीस बीएल संतोष आणि पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीचे सदस्य उपस्थित राहणार असल्याची शक्यता आहे.
एका मतदारसंघासाठी तीन नावे:पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्नाटकातील भाजपच्या कोअर ग्रुपने प्रत्येक विधानसभेच्या जागेसाठी तीन नावे निवडली आहेत, जी केंद्रीय निवडणूक समितीसमोर ठेवली जातील. उमेदवार निश्चित करण्यापूर्वी पक्षाचे केंद्रीय नेतृत्व या नावांवर विचारमंथन करणार आहे. कर्नाटकची विधानसभा निवडणूक भाजपसाठी अत्यंत महत्त्वाची असून, त्यासाठी भाजपने आपली पूर्ण ताकद लावली आहे. नुकत्याच आलेल्या सर्व्हेमध्ये भाजपाला कर्नाटकात मोठा झटका मिळू शकतो, अशी शक्यता वर्तविण्यात आल्याने भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीकडे जास्तीचे लक्ष घातले आहे.