हैदराबाद -गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा भाजपने घेतलेला राजीनामा ही रणनीती आहे की अचानक घेतलेला निर्णय आहे? विजय रुपाणी यांचा राजीनामा अचानकपणे घेण्यात आला नसल्याचे बोलले जात आहे.
विजय रुपाणी आणि पक्षाच्या संघटनात खूप दिवसांपासून मतभेद सुरू होते. भाजपचे प्रदेश अध्यक्ष सी. आर. पाटील यांच्याबरोबर मुख्यमंत्र्यांचे चांगले संबंध नव्हते. त्याबाबत गृहमंत्री अमित शाह यांनी अनेकदा हस्तक्षेप केला होता. सुत्राच्या माहितीनुसार 2021 मध्ये भाजपच्या प्रदेश नेत्यांनी रुपाणी यांच्याविरोधात पक्षाच्या वरिष्ठांना अहवाल दिला होता. विजय रुपाणी यांच्या नेतृत्वात सरकार कमकुवत झाल्याचे अहवालात म्हटले होते. गुजरातच्या राजकारणात रुपाणींच्या राजीनाम्यांची खूप दिवसांपासून चर्चा सुरू होती.
जैन समुदायातून आलेले विजय रुपाणी यांचा जन्म 2 ऑगस्ट 1956 मध्ये म्यानमारमध्ये झाला होता. 1960 मध्ये त्यांचे वडील भारतात परतले होते. 65 वर्षीय विजय रुपाणी यांनी 1971 मध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत विद्यार्थी नेता म्हणून राजकीय कारकीर्द सुरू केली होती. आपत्कालीन काळात त्यांना तुरुंगावसही भोगला. 90 च्या दशकात रुपाणी हे भाजपशी जोडले. निवडणूक जाहीरनामा समितीच्या अध्यक्षपदाची त्यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली.
अशी आहे रुपाणी यांची राजकीय कारकीर्द
रुपाणी यांनी 2007 ते 2012 पर्यंत सौराष्ट्रची विधानसभा निवडणुकीची जबाबदारी सांभाळली. त्यांच्यामुळे भाजपला मोठे यश मिळाले. त्यानंतर पक्षात त्यांचे वजन वाढत गेले. नरेंद्र मोदी आणि आनंदी बेन पटेल यांचे सरकार असताना विजय रुपाणी यांना मंत्रिपद मिळाले. 2016 मध्ये आरक्षणासाठी पाटीदार समाजाने मोठे आंदोलन केले. त्यामुळे आनंदी बेन सरकारला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. तेव्हा भाजपने रुपाणी यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला. विजय रुपाणी हे 7 ऑगस्ट 2016 मध्ये पहिल्यांदा गुजरातचे मुख्यमंत्री झाले. त्यांच्या नेतृत्वात भाजपने 2017 ची निवडणूक लढविली. भाजपला निवडणुकीत बहुमत मिळाले नाही. रस्सीखेच करत भाजपने 182 जागांपैकी 99 जागांवर विजय मिळविला. 26 डिसेंबर 2017 ला विजय रुपाणी यांनी दुसऱ्यांदा गुजरातचे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून सलग पाच वर्षे काम केलेल्या मोजक्या मुख्यमंत्र्यांमध्ये विजय रुपाणी यांचा समावेश होतो. मात्र, त्यांचा दुसऱ्या टप्प्यातील कार्यकाळ पूर्ण झाला नाही.
भाजपचा नवीन प्रयोग आहे का?