पद्दुचेरी :पुढील महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी भाजपाने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. यामध्ये तरुणांसाठी अडीच लाख नव्या नोकऱ्या, मच्छिमारांसाठी वार्षिक आर्थिक मदत आणि उच्चशिक्षण घेणाऱ्या तरुणींसाठी मोफत स्कूटी देण्याचे आश्वासन भाजपाने दिले आहे.
हा जाहीरनामा आम्ही एसीमध्ये बसून तयार केला नाही, तर लोकांकडून आलेल्या सूचनांच्या नुसार तयार करण्यात आला आहे. त्यामुळे यात सर्वांना न्याय देण्यात आला आहे. मोदीजी तुम्हाला दिलेली आश्वासने नक्कीच पूर्ण करतील, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण हा जाहीरनामा प्रसिद्ध करताना म्हणाल्या.
जाहीरनाम्यातील इतर ठळक मुद्दे..
- प्रधानमंत्री किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना २,००० रुपये आर्थिक मदत.
- पुद्दुचेरीसाठी जलसुरक्षा योजना.
- राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत कॅटल डेव्हलपमेंट सेंटर.
- मच्छिमारांच्या पत्नींसाठी आणि मासे विक्री करणाऱ्यांसाठी मुद्रा लोन.
- मासेमारीस बंदी असणाऱ्या कालावधीमध्ये पाच ते आठ हजार रुपयांची आर्थिक मदत.
- डिझेल, कोल्ड स्टोरेज आणि फायबर बोटींसाठी सबसिडी.
- व्यापारासाठी पोषक वातावरण आणि सबसिडी.
- पद्दुचेरी शिक्षण बोर्डाची स्थापना.
- पद्दुचेरी फायनान्शिअल कॉर्परेशनची स्थापना.
- मेगा टेक्स्टाईल पार्क.
- केजी टू पीजीपर्यंत मुलींना मोफत शिक्षण.
- महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप.
- सर्व मंदिरांच्या डागडुजीसाठी विशेष तरतूद.
पद्दुचेरीमध्ये ३० विधानसभा जागांसाठी सहा एप्रिलला मतदान पार पडणार आहे. २ मे रोजी याचा निकाल जाहीर होईल.