नवी दिल्ली -पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेतील हलगर्जीपणाचे प्रकरण जोर धरू लागले आहे. या संदर्भात भारतीय जनता पक्षाचे खासदार, आमदारांसह सर्व नेते शुक्रवारी राजघाट आणि आंबेडकर पुतळ्याजवळ बसून दोन तास मौन पाळणार आहेत. यासोबतच भाजपाचे सर्वोच्च नेतृत्व आपापल्या राज्यांच्या राज्यपालांना पीएम मोदींच्या ( BJP Plans Nationwide Campaign Against Cong ) सुरक्षेतील त्रुटी आणि काँग्रेसविरोधात निवेदन सादर करणार आहेत. याशिवाय भाजपा काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनाही पत्र लिहणार आहे.
गुजरात आणि गोव्यातील भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) शिष्टमंडळांनी गुरुवारी राज्यपालांची भेट घेतली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यादरम्यान सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी प्रकरणी कठोर कारवाईची मागणी केली. गुजरातमधील सत्ताधारी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राज्यपाल आचार्य देवव्रत यांची भेट घेऊन यासंदर्भात निवेदन सादर केले. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्यासह राज्याचे गृह राज्यमंत्री हर्ष संघवी हेही या शिष्टमंडळाचा एक भाग असल्याचे भाजपाच्या एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
निवेदनानुसार, भाजपा नेत्यांनी या संपूर्ण प्रकरणाबाबत पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह राज्यातील भाजप नेत्यांनी गुरुवारी राज्यपाल पीएस श्रीधरन पिल्लई यांची भेट घेतली आणि पंतप्रधानांच्या सुरक्षेतील त्रुटींबद्दल पंजाब सरकारला बरखास्त करण्याची मागणी केली. शिष्टमंडळात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट यांच्यासह अन्य नेत्यांचा समावेश होता. शिष्टमंडळाची भेट घेतल्यानंतर राज्यपालांनी पत्रकारांशी बोलताना ही मागणी वरिष्ठांपर्यंत पोहोचवणार असल्याचे सांगितले.