ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधींशी बातचित करताना के के शर्मा नवी दिल्ली :काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. मल्लिकार्जुन खर्गे यांनी कलबुर्गी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विषारी साप म्हणून टीका केली आहे. त्यानंतर खर्गे यांनी खुलासा करत आपल्या वक्तव्यावर सारवासारव केली, मात्र आता त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्याने चांगलाच वाद निर्माण झाला आहे. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते के के शर्मा यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांनी देशाची जाहीर माफी मागावी अशी मागणी केली आहे.
काय म्हणाले मल्लिकार्जुन खर्गे :काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी कर्नाटक विधानसभेच्या निवडणूक प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर चांगलाच हल्लाबोल केला. नरेंद्र मोदी हे विषारी सापासारखे असल्याची टीका त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली. त्यामुळे मल्लिकार्जुन खर्गे यांच्याविरोधात चांगलेच रान पेटले आहे.
देशाची मागावी जाहीर माफी :काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केल्यानंतर देशभरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. या मुद्द्यावर ईटीव्ही भारतशी बोलताना भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते केके शर्मा यांनीही खर्गेंवर टीका केली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे हे विधान अत्यंत निषेधार्ह आहे. काँग्रेस अध्यक्षांनी आपले वक्तव्य मागे घेऊन देशासमोर जाहीर माफी मागावी, असेही के के शर्मा यावेळी म्हणाले. काँग्रेस नेत्यांनी पंतप्रधानांना शिवीगाळ करण्याची ही पहिलीच वेळ नाही. तर याआधीही त्यांनी पंतप्रधानांबद्दल अत्यंत आक्षेपार्ह विधाने केली आहेत. कधी साप, कधी विंचू, कधी चहावाला तर कधी मृत्यूचा व्यापारी असे शब्द त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी वापरली असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
सोनिया गांधींनी म्हटले होते मौत का सौदागर :काँग्रेस नेत्यांनी अनेक वेळा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली आहे. गुजरात निवडणुकीत काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी पंतप्रधानांना मौत का सौदागर असे म्हटले होते. त्यांच्या या टीकेमुळे देशभरात संताप निर्माण झाला होता. मात्र सोनिया गांधीच्या त्या टीकेचा फायदा भाजपला निवडणुकीत झाला होता. त्याशिवायही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर चायवाला, विंचू आदी टीका करण्यात आल्या आहेत. मात्र त्याचा भाजपला चांगलाच फायदा झाला. याबाबत बोलताना के के शर्मा यांनी हा नफा-तोट्याचा विषय नाही. पंतप्रधान हे केवळ पक्षाचे पंतप्रधान नसून देशाचे पंतप्रधान असतात. काँग्रेस नेत्यांसाठीही ते पंतप्रधान असतात, असे स्पष्ट केले आहे.
हेही वाचा - Amartya Sen Sues Visva Bharati : जागेच्या वाद प्रकरणी अमर्त्य सेन यांनी ठोठावला न्यायालयाचा दरवाजा; विश्वभारतीवर दाखल केला खटला