नवी दिल्ली - मुंबई दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेले पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांच्याबाबत भाजपा खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. हेमंत करकरे यांना आपण देशभक्त मानत नसल्याचे त्यांनी म्हटलं. भोपाळजवळील सीहोर येथे भाजपाकडून 25 जूनला आणीबाणीविरोधी काळा दिवस पाळण्यात आला होता. येथे आयोजित कार्यक्रमाला संबोधित करताना त्यांनी हे विधान केले. यापूर्वीही त्यांनी आपल्या शापामुळेचे हेमंत करकरे ठार झाल्याचे म्हटलं होते. या विधानानंतर साध्वी आणि भाजपाला मोठ्या टीकेचा सामना करावा लागला होता. आता त्यांनी पुन्हा हेमंत करकरेसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्याने त्या पुन्हा टिकेच्या धनी होऊ शकतात.
एक आणीबाणी 1975 मध्ये लागू करण्यात आली होती. तर दुसरी आणीबाणी परिस्थिती 2000 मध्ये मालेगाव स्फोटात मला तुरूंगात टाकल्यानंतर निर्माण झाली होती. करकरे यांना काही लोक देशभक्त म्हणतात. पण जे खरोखरच देशभक्त आहेत. त्यांना देशभक्त म्हटलं जात नाही. माझी माहिती मिळवण्यासाठी करकरे यांनी मला आठवीत शिकवणाऱ्या आचार्यची बोटे मोडली होती. करकरेंनी मला खोट्या प्रकरणात गोवलं, असे साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर म्हणाल्या. हेमंत करकरे यांच्या संदर्भात साध्वी यांनी यापूर्वीही वादग्रस्त विधान केली आहे.
दिवंगत मुंबईचे एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांच्याबद्दल गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात साध्वी प्रज्ञासिंह यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. हेमंत करकरे यांनी माझ्यावर केलेली कारवाई ही देशद्रोही आणि धर्मविरोधी होती. मी त्यांना सांगितले की तुमचा सर्वनाश होईल. मी खूप त्रास सहन केला. ज्या दिवशी मी तुरुंगात गेले. त्या दिवशी सुतक सुरू झाले होते. दहशतवाद्यांनी हेमंत करकरेंना मारुन माझे सुतक संपवले, असे त्या म्हणाल्या होत्या. तसेच आपल्याच शापामुळे हेमंत करकरे यांचा मृत्यू झाल्याचे विधान निवडणुकीच्या प्रचार सभेमध्ये साध्वी यांनी केले होते.