भोपाळ -आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असणाऱ्या भाजपा खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर आता नव्या विधानाने चर्चेत आल्या आहेत. गोमूत्र प्यायल्याने कोरोना होत नाही, मीही पिते, मला कोरोना झाला नाही, असे विधान त्यांनी केले आहे. तसेच तुम्ही गोमूत्र प्या आणि गो पालन करा, असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे.
गोमूत्र प्यायल्याने फुफ्फुसात झालेला संसर्ग दूर होतो. मी स्वत: गोमूत्रं पिते, त्यामुळेच मला कधी कोणती औषधे घ्यावी लागत नाहीत. मला कोरोनाही झाला नाही, असं प्रज्ञासिंह ठाकूर यांनी म्हटलं आहे.
याचबरोबर देशी गाय पाळण्याचं त्यांनी आवाहन केलं. तसेच एक कोटी वृक्ष लावणार असल्याचंही त्यांनी सांगितले. संत नगरमधील डॉ. हेडगेवार रुग्णालयाला 25 ऑक्सिजन कंसन्ट्रेटर देण्यासाठी प्रज्ञासिंह ठाकूर आल्या होत्या. यावेळी बोलताना त्यांनी हे विधान केले. तसेच त्यांनी लोकांना खबरदारी घेण्याचे आणि सरकारकडून जारी केलेल्या सुचनांचे पालन करण्याचे आवाहन केले.