गोंडा (उत्तर प्रदेश) : स्वातंत्र्यदिनी उत्तर प्रदेशातील गोंडा येथे भाजपा खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्या नेतृत्वाखाली तिरंगा यात्रा काढण्यात आली. यावेळी जनतेला संबोधित करताना त्यांनी आपली तुलना चक्क मुगल बादशाह शाहजहानशी केली. ते म्हणाले की, जगात फक्त दोनच प्रेमी जन्माला आले - एक शाहजहान आणि दुसरा ब्रिजभूषण! 'शाहजहानने ताजमहाल बांधला होता, मी नंदिनी नगर बांधले', असे ते म्हणाले. तसेच 'देशाच्या फाळणीला जवाहरलाल नेहरू जबाबदार आहेत. त्यांच्या चुकीच्या धोरणामुळे आपण जिंकलेले क्षेत्र गमावले, असे ब्रिजभूषण सिंह म्हणाले.
अशी केली तुलना : खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी मंगळवारी त्यांचे वडिलोपार्जित निवासस्थान बिष्णोहरपूर ते नवाबगंजच्या नंदिनी नगरपर्यंत तिरंगा यात्रा काढली. यानंतर त्यांनी जनतेला संबोधित केले. यावेळी बोलताना ब्रिजभूषण सिंह यांनी नंदिनी नगर हे नाव कुठून आले, असा प्रश्न मंचावरून केला. ते म्हणाले की, काही लोकांमध्ये अशी चर्चा होती की नंदिनी हे ब्रिजभूषणच्या आईचे नाव आहे. काही लोकांनी मुलीचे नाव सांगितले तर काही लोकांनी ते माझ्या मैत्रिणीचे नाव असल्याचे सांगितले. यावर त्यांनी स्वतःची तुलना मुघल सम्राट शाहजहानशी केली. ते म्हणाले की, शाहजहानने आपल्या प्रेयसीच्या स्मरणार्थ ताजमहाल बांधला होता. ब्रिजभूषण यांनी नंदिनी नगरची स्थापना केली.