नवी दिल्ली -तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा या त्यांच्या लोकसभेतल्या भाषणामुळे जोरदार चर्चेत आल्या आहेत. लोकसभेत राष्ट्रपती अभिभाषणावर धन्यवाद प्रस्तावावर चर्चा सुरू असताना महुआ मोईत्रा यांनी माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यावर टिप्पणी केली होती. त्यावर भारतीय जनता पक्षाचे खासदार निशिकांत दुबे आणि पी.पी चौधरी यांनी महुआ मोईत्रा यांच्या विरोधात लोकसभेत विशेषाधिकार भंगाची नोटीस बजावली आहे.
सभागृह सभापतींना दोन्ही नेत्यांनी पत्र लिहलं आहे. 8 फेब्रुवारी 2021 रोजी खासदार महुआ मोइत्रा यांनी माजी सरन्यायाधीश श्री रंजन गोगोई यांच्या कर्तव्य बजावण्याच्या कार्यप्रणालीबाबत सभागृहात भाष्य केले. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 121 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या किंवा कोणत्याही उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या वर्तनाबाबत संसदेत चर्चा होणार नाही, असे स्पष्ट केले आहे. विशेषाधिकारांचे हेतुपुरस्सर उल्लंघन केल्याच पत्रात म्हटलं आहे.