महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

पंजाब : आंदोलक शेतकऱ्यांनी भाजपा आमदाराचे कपडे फाडत काळेही फासले - पंजाब शेतकरी आंदोलन अपडेट

पंजाबमध्ये संतापलेल्या आंदोलक शेतकऱ्यांनी एका भाजपा आमदाराला मारहाण केल्याची आणि त्यांचे कपडे फाडत काळेही फासल्याची घटना घडली आहे. शेतकरी आंदोलनाला तब्बल चार महिने पूर्ण झाले आहेत. मात्र, अद्याप तोडगा निघालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भाजपा सरकारविरोधात रोष आहे.

पंजाब
पंजाब

By

Published : Mar 28, 2021, 7:25 AM IST

नवी दिल्ली -केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला तब्बल चार महिने पूर्ण झाले आहेत. मात्र, अद्याप तोडगा निघालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भाजपा सरकारविरोधात रोष आहे. अनेक गावांमध्ये भाजपा नेत्यांवर बहिष्कार टाकण्यात आला आहे. यातच पंजाबमध्ये संतापलेल्या आंदोलक शेतकऱ्यांनी एका भाजपा आमदाराला मारहाण केल्याची आणि त्यांचे कपडे फाडत काळेही फासल्याची घटना घडली आहे.

आंदोलक शेतकऱ्यांनी भाजपा आमदाराचे कपडे फाडत काळेही फासले

अबोहरमधील आमदार अरुण नारंग हे काही स्थानिक नेत्यांसोबत राज्य सरकार विरोधात पत्रकार परिषद घेण्यासाठी शनिवारी मलोट येथे आले होते. नारंग आपल्या कारने या ठिकाणी पोहचताच. त्यांच्याच येण्याची वाट पाहत असलेल्या संतापलेल्या शेतकऱ्यांच्या जमावाने त्यांना घेरले. शेतकऱ्यांनी त्यांच्यावर शाई फेकली. तसेच त्यांच्या कारलाही काळं फासलं.

या घटनेनंतर पोलिसांनी आमदार अरुण यांना एका दुकानात थांबवले. मात्र, जेव्हा ते बाहेर आले. तेव्हा पुन्हा शेतकऱ्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. नारंग यांना मारहाण केली आणि कपडेही फाडले. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात पोलीस एका व्यक्तीचं शेतकऱ्यांपासून बचाव करताना दिसत आहेत. आंदोलक हे भाजपाच्या आमदारांना गावात पत्रकार परिषद घेवू देणार नसल्याचे पोलीस उपअधीक्षक जसपाल सिंग यांनी सांगितले. या संपूर्ण घटनेनंतर पोलिसांनी त्यांना सुरक्षित ठिकाणी पोहचवलं.

'भारत बंद' ला चांगला प्रतिसाद -

शनिवारी शेतकरी संघटनांनी 'भारत बंद' ची हाक दिली होती. याला देशभरातून प्रतिसाद मिळाला. देशातील विविध शेतकरी संघटनांसह विरोधी पक्षांनीही या आंदोलनात सहभाग नोंदवला. किसान मजूर संघर्ष समितीच्या सदस्यांनी संयुक्त किसान मोर्चाच्या पुकारलेल्या १२ तास चाललेल्या ‘भारत बंद’ दरम्यान अमृतसरमध्ये अमृतसर-दिल्ली रेल्वे ट्रॅक रोखला. शेतकरी संघटनांनी घोषित केलेल्या भारत बंदला काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिला आहे. पाठिंबा दर्शवण्यासाठी काँग्रेसकडून मंत्रालयाबाहेर आंदोलन करण्यात आले.

कृषी कायदे रद्द करण्याची शेतकऱ्यांची मागणी -

प्रामुख्याने पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशातील हजारो शेतकरी सिंघू, टिकरी आणि गाझीपूर येथे तळ ठोकून आहेत. शेतकरी कायदे रद्द करावे अशी त्यांची मागणी आहे. तीन शेतीविषयक कायदे रद्द करणे, शेतकर्‍यांवरील सर्व पोलीस खटले रद्द करणे, डिझेल, पेट्रोल आणि गॅसच्या किंमती कमी करणे, या मागण्या शेतकऱ्यांनी केल्या आहेत. निषेध करणार्‍या संघटना आणि सरकार यांच्यात आतापर्यंत चर्चेच्या 11 फेऱ्या झाल्या आहेत. मात्र, तोडागा निघालेला नाही. कृषी कायदे रद्द करण्याची मागणी शेतकरी संघटनांनी केली आहे. तर सरकारने 12-18 महिने शेती कायदे स्थगित करण्याची ऑफर शेतकऱ्यांना दिली होती. ती शेतकरी संघटनांनी नाकारली.

हेही वाचा -भारत बंदला देशभरातून संमिश्र प्रतिसाद; चर्चा नको, कायदे रद्द करा - शेतकऱ्यांची मागणी

ABOUT THE AUTHOR

...view details