नवी दिल्ली - बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला असून राज्यात एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. नवीन सरकार स्थापन करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू करण्यात आल्या असून आज एनडीएच्या विधिमंडळ नेतेपदी नितीश कुमार यांची निवड करण्यात आली आहे. तर भाजपच्या गटनेतेपदी तारकिशोर प्रसाद यांची निवड झाली आहे. त्यामुळे राज्यात मुख्यमंत्री नितीश कुमार असले तरी उपमुख्यमंत्री सुशील मोदी नसणार असल्याचे बोलले जात आहे.
भाजपच्या गटनेतेपदी तारकिशोर प्रसाद यांची निवड झाल्यानंतर सुशील मोदी यांनी टि्वट करून त्यांना शुभेच्छा दिल्या. तारकिशोर प्रसाद हे बिहारमधील एक ज्येष्ठ नेते आहेत. 64 वर्षीय तारकिशोर प्रसाद भाजपच्या तिकिटावर कटिहार मतदारसंघातून सलग चौथ्यांदा निवडून आले आहेत. त्यांनी राजदचे डॉ. राम प्रकाश महतो यांना पराभूत केले. गेल्या निवडणुकीमध्ये त्यांनी जेडीयूच्या उमेदवाराचा पराभव केला होता.
उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या संपत्तीविषयी विवरणपत्रात तारकिशोर प्रसाद यांच्याकडे 1.9 कोटी आहे. यात 49.4 लाख रुपये जंगम संपत्ती आहे. तर 1.4 स्थावर मालमत्ता आहे. लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्था अशा सर्वच निवडणुकांपूर्वी उमेदवाराला निवडणूक आयोगाकडे प्रतिज्ञापत्र सादर करावे लागते. या प्रतिज्ञापत्रात संबंधित उमेदवाराची वैयक्तिक माहिती, संपत्ती, व्यवसाय, गुन्हेगारी पार्श्वभूमी अशी सर्व माहिती नमूद करावी लागते.
सत्तास्थापनेसाठी राज्यपालांचे नितीश कुमारांना आमंत्रण -
बिहारचे राज्यपाल फागू चौहान यांनी जेडीयूचे नेते नितीश कुमार यांना आज (रविवार) सत्ता स्थापनेचे आमंत्रण दिले आहे. काल नितीश कुमार राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) 125 आमदारांची यादी घेऊन राज्यपालांच्या भेटीला गेले होते. यावेळी त्यांनी राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा केला होता. त्यानंतर राज्यपालांनी नितीश कुमारांना सत्ता स्थापनेसाठी आमंत्रण दिले आहे. नितीश कुमार उद्या सातव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासोबत 16 मंत्री शपथ घेतील.