नवी दिल्ली - विजय रुपाणी यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर गुजरातमध्ये राजकीय घडामोडी वेगवान झाल्या आहेत. आज दुपारी भाजप आमदारांची बैठक पार पडणार आहे. या बैठकीसाठी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आणि नरेंद्र सिंह तोमर हे दोघे भाजपाचे केंद्रीय निरीक्षक म्हणून गुजरात दौऱ्यावर आले आहेत.
केंद्रीय मंत्र्याच्या निरीक्षणात अहमदाबादमध्ये आज बैठक गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी शनिवार राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे आपला राजीनामा सादर केला. त्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया, नितिन पटेल, पुरुषोत्तम रुपाला, सीआर पाटील यांची नावे मुख्यमंत्री पदासाठी आघाडीवर आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आज पक्षाच्या सर्व आमदारांना गांधीनगरमध्ये बोलावण्यात आले आहे. भाजपाचे केंद्रीय संघटन मंत्री बीएल संतोष आणि भूपेंद्र यादव गांधीनगरमध्ये उपस्थित आहेत.
राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे राजीनामा दिल्यानंतर माजी मुख्यमंत्री रुपाणी म्हणाले की, आता मला पक्ष जी जबाबदारी देईल ती मी पार पाडणार आहे. भाजपाने माझ्या सारख्या कार्यकर्त्याला मुख्यमंत्री केले. आता गुजरातचा विकास नव्या नेतृत्वाखाली केला जाईल, असे म्हणत रुपाणी यांनी यावेळी पंतप्रधान मोदी यांचेही आभार मानले.
पुढील वर्षी 2022 मध्ये गुजरातसह यूपी, उत्तराखंड, पंजाब, मणिपूर आणि गोवा विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. त्या दृष्टीने भाजपाने आपली रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. उत्तराखंड आणि कर्नाटकमध्ये भाजपाने अशाच पद्धतीने निवडणुकांपूर्वी मुख्यमंत्री बदलले आहेत. गुजरातमधील मुख्यमंत्र्यांचा राजीनामा त्याचाच एक भाग आहे. भाजपाने गेल्या पाच महिन्यात तीन मुख्यमंत्री बदलले आहेत.