जम्मू-काश्मीर - पुलवामा येथे दहशतवाद्यांनी भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. त्राल नगरपालिकेच्या समितीचे अध्यक्ष आणि पुलवामा जिल्हा भाजप युनिटचे सचिव राकेश पंडिता यांची दहशतवाद्यांनी हत्या केली. ही घटना बुधवारी (२ जून) रोजी घडली. राकेश पंडिता यांच्या राहत्या घराबाहेर त्यांच्यावर दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्या. या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले. यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
पुलवामा येथे दहशतवाद्यांनी भाजप नेत्याची गोळ्या झाडून केली हत्या - बीजेपी
त्राल नगरपालिकेच्या समितीचे अध्यक्ष आणि पुलवामा जिल्हा भाजप युनिटचे सचिव राकेश पंडिता यांची दहशतवाद्यांनी हत्या केली. ही घटना बुधवारी (२ जून) रोजी घडली
घरातून बाहेर पडले असताना झाला गोळीबार
राकेश पंडिता हे बुधवारी रात्री दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील त्राल येथील आपल्या राहत्या घरातून बाहेर पडले असताना त्यांच्यावर दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्या. गोळीबार केल्यावर दहशतवादी घटनास्थळावरून पळून गेले. दरम्यान, गोळीबाराचा आवाज ऐकताच स्थानिक नागरिकांनी राकेश यांच्याकडे धाव घेतली. त्यावेळी राकेश पंडिता हे जखमी अवस्थेत होते. त्यांना तात्काळ स्थानिकांनी जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी सुरक्षा दलाचे जवान दाखल झाले. सुरक्षा दल आणि पोलिसांच्या पथकाकडून या दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे.