कोलकाता -पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांपूर्वी बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी भाजपात प्रवेश केला होता. तेव्हा एका सभेत त्यांनी स्वतःचा उल्लेख कोब्रा असा केला होता. त्यावरून ते आता अडचणीत आले आहेत. याप्रकरणी मिथुन चक्रवर्ती यांची आज कोलकाता पोलिसांनी चौकशी केली. मिथुन चक्रवती यांच्या भाषणाने मतदानानंतरच्या हिंसाचाराला प्रोत्साहन मिळाल्याचे पोलिसांनी म्हटलं.
कोलकाता पोलिसांनी दाखल केलेली एफआयआर रद्द करण्यासाठी मिथुन चक्रवर्ती यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्ती तीर्थंकर घोष यांनी याचिकाकर्ता वकिलांच्या विनंतीवरून पुढील सुनावणी 18 जूनपर्यंत तहकूब केली.
मिथुन चक्रवर्ती यांनी आपल्या याचिकेत असा दावा केला आहे, की चित्रपटांमधील ते संवाद केवळ विनोदासाठी बोलले गेले होते. कोणत्याही गुन्ह्यात सहभाग नसल्याचे त्यांनी याचिकेत म्हटलं. कोलकाताच्या माणिकटला पोलीस स्टेशनमध्ये मिथुनविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. प्रचार सभेतील त्यांच्या संवादांमुळे राज्यात मतदानोत्तर हिंसाचार भडकला, असे तक्रारीत म्हटलं आहे.