नवी दिल्ली: भारतीय जनता पक्षाने (भाजप) गुरुवारी सर्व लोकसभा खासदारांना अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान 13 फेब्रुवारीपर्यंत सभागृहात उपस्थित राहण्याचा तीन ओळींचा व्हिप जारी केला आहे. संसदेतील अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारी रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या लोकसभा आणि राज्यसभेतील संयुक्त अभिभाषणाने सुरू झाले आहे. अधिवेशनात काही महत्त्वाचे विषय उपस्थित होऊ शकतात म्हणून भाजपने हा व्हीप जारी केल्याचे समजते.
मोदींनी लोकसभेत दिले उत्तर:अदानी एंटरप्रायझेस आणि अदानी समूहाच्या इतर कंपन्यांवरील हिंडेनबर्ग अहवालावर चर्चेची मागणी विरोधी पक्ष सातत्याने करत आहेत. त्यांनी या मुद्द्यावर पंतप्रधानांनी बोलावे अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी लोकसभेत धन्यवाद प्रस्तावाला उत्तर देताना सांगितले की, राष्ट्रपतींनी दोन्ही सभागृहांना आपल्या दूरदर्शी भाषणात राष्ट्राला दिशा दिली आणि देशाच्या 'नारी शक्ती'ला प्रेरणा दिली. त्यांनी राष्ट्राच्या 'संकल्प से सिद्धी'ची तपशीलवार ब्लू प्रिंट दिली, असे मोदी म्हणाले.
महत्त्वाच्या निवडी होण्याची शक्यता:अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान भाजपकडून काही महत्त्वाच्या निवडी केल्या जाऊ शकतात. त्यामुळेच सर्व खासदारांना १३ तारखेपर्यंत संसदेत उपस्थित राहण्यासाठी तीन ओळींचा व्हीप बजावण्यात आला आहे. पुढील काही दिवसांत संसदेत मोठ्या प्रमाणावर हालचाली होण्याची अपेक्षा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत राष्ट्रपतींच्या धन्यवादाच्या प्रस्तावादरम्यान केलेल्या भाषणात विरोधकांना योग्य उत्तर दिल्यानंतर भाजपने आज व्हीप जारी केला.