नवी दिल्ली :कर्नाटकच्या पराभवानंतर भाजपने चांगलाच धडा घेतल्याचे दिसून येत आहे. आगामी निवडणुकीच्या तयारीत भाजप कोणतीही संधी सोडत नसल्याचे दिसून येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी पाच तासांच्या सविस्तर बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजप पक्षाध्यक्ष जेपी नड्डा आणि भाजप संघटन मंत्री बी एल संतोष आदी उपस्थित होते. भाजपने आगामी लोकसभा आणि आगामी विधानसभा निवडणुकांच्या सूक्ष्म व्यवस्थापनासाठी महत्त्वाकांक्षी योजना आखली आहे.
काय आहे भाजपची योजना : भाजप पक्षाने विशिष्ट धोरण विकसित केल्याची सध्या चर्चा आहे. भाजपने आगामी निवडणुकीच्या तयारीसाठी संपूर्ण देश तीन विभागांमध्ये विभागला आहे. यात उत्तर प्रदेश, दक्षिण क्षेत्र आणि पूर्व प्रदेश. या विभाजनाचा उद्देश पक्षाच्या कामकाजात सुसूत्रता आणून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभावी समन्वय साधणे असल्याचे बोलले जात आहे. या योजनेला गती देण्यासाठी भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा आणि संघटन मंत्री यांनी प्रत्येक भागातील प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठी आखल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सल्ला :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्र्यांना समाजातील उपेक्षित आणि वंचित घटकांच्या कल्याणाला प्राधान्य देण्याचा सल्ला दिला आहे. मंत्र्यांना या गटांच्या कल्याणासाठी विशेष लक्ष देण्यास सांगितले आहे. शिवाय, पंतप्रधानांनी मंत्र्यांना त्यांच्या संसदीय मतदारसंघातील मागासवर्गीयांवर लक्ष केंद्रित करून त्यांचे जीवनमान उंचावण्याचे मार्ग शोधण्याचे आवाहन केले.
पूर्व विभागाची मीटिंग : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी निवडणुकीचे नियोजन करण्यासाठी बोलावलेली बैठक 6, 7 आणि 8 जुलै रोजी होमार आहेत. प्रत्येक दिवस विशिष्ट प्रदेशासाठी राखिव ठेवण्यात येणार आहे. यात बिहार, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल, आसाम, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम, मेघालय आणि त्रिपुरा या राज्यांवर लक्ष केंद्रित करून गुवाहाटी येथे 6 जुलै रोजी पूर्व क्षेत्रीय बैठक होणार आहे.