प्रयागराज :उमेश पाल हत्येप्रकरणी नाव समोर आल्यानंतर भारतीय जनता पक्षाने आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यावर कडक कारवाई केली आहे. भाजपने अल्पसंख्याक सेलचे महानगर अध्यक्ष राहिल हसन यांना पदावरून हटवले आहे. प्रयागराजमधील अल्पसंख्याक सेलची समितीही बरखास्त करण्यात आली आहे. उमेश पाल हत्येप्रकरणी अल्पसंख्याक सेलचे महानगर अध्यक्ष राहिल हसन यांचा भाऊ मोहम्मद गुलाम याच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या खून प्रकरणात गुलामची शूटर म्हणून नोंद करण्यात आली आहे. घटनेनंतर तोही फरार आहे.
सोशल मीडियावरील टीकेनंतर कारवाई : उत्तर प्रदेश एसटीएफने गुलामचा भाऊ आणि भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्याक सेलचे महानगर अध्यक्ष राहिल हसन यांना ताब्यात घेतले आहे. राहिल हसन गेल्या काही दिवसांपासून तपास यंत्रणेच्या ताब्यात आहे. यावरून सोशल मीडियावर भाजपवर टीका होत होती, त्यामुळे भाजपने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. महानगराध्यक्ष गणेश केसरवाणी यांनी ही बाब गांभीर्याने घेत संपूर्ण समिती बरखास्त केली आहे. त्यांनी याची माहिती माध्यमांना दिली. विशेष म्हणजे, गोळीबार प्रकरणापूर्वीच अल्पसंख्याक सेलची समिती बरखास्त करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. उमेश पाल गोळीबार प्रकरणाच्या आठवडाभरापूर्वी राहिल हसनने मंत्री दानिश आझाद अन्सारी यांच्यासाठी भाजप कार्यालयात कार्यक्रम आयोजित केला होता.