देहरादून : उत्तराखंडमध्ये मोठी राजकीय घडामोड घडली असून, भाजपने कॅबिनेट मंत्री असलेल्या हरकसिंग रावत यांची पक्षातून हकालपट्टी केली ( Harak Singh Rawat Expelled From BJP ) आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष मदन कौशिक यांनी याला दुजोरा दिला आहे. यासोबतच हरकसिंग रावत यांचीही मंत्रिमंडळातूनही हकालपट्टी करण्यात आली आहे. हरकसिंग बऱ्याच काळापासून भाजपवर नाराज होते. तेव्हापासून ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची अटकळ बांधली जात ( Harak Singh Rawat Will Join Congress ) होती.
रावत दिल्लीला गेले आणि झाली हकालपट्टी
हरकसिंग रावत रविवारी संध्याकाळीच दिल्लीत पोहोचले होते. त्यांची सून अनुकृती हिच्या तिकिटासाठी लॉबिंग करण्यासाठी ते येथे पोहोचल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, याच दरम्यान राज्यात अशी काही राजकीय समीकरणे बदलली की भाजपने त्यांची पक्षातूनच हकालपट्टी केली.
नाराज असल्याची होती चर्चा
याआधी हरकसिंग रावत हे भाजपच्या कोअर ग्रुपच्या बैठकीलाही गेले नव्हते. कोअर ग्रुपचे सदस्य असूनही हरक सिंग बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. यानंतर हरक सिंह नाराज असल्याची चर्चा होती. वास्तविक हरक सिंग लॅन्सडाउनमधून त्यांची सून अनुकृती गुसैन ( Anukriti Gusain ) हिच्या उमेदवारी तिकिटासाठी लॉबिंग करत होते. परंतु लॅन्सडाउनचे आमदार दिलीप रावत ( MLA Dilip Rawat ) हे त्यांच्या विरोधात होते. त्याचबरोबर भाजप संघटनाही हरक यांच्यावर नाराज होती. या पार्श्वभूमीवर हा मोठा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे.
काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता
माजी मुख्यमंत्री हरीश रावत ( EX CM Harish Rawat ) आणि राज्यातील इतर नेत्यांच्या उपस्थितीत उद्या दिल्लीत हरक सिंग आणि त्यांची सून अनुकृती हे काँग्रेसमध्ये प्रवेश करू शकतात, अशी चर्चा आहे. हरकसिंग रावत यांच्यासोबत आणखी काही आमदारही काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.