भोपाळ :सध्या देशात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रसार होत आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या नियमांचा भंग करणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करण्यात येताना दिसून येत आहे. मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये पोलिसांनी मात्र एक पाऊल पुढे जात, कोरोनाचा नियम मोडणाऱ्या एका श्वानालाही अटक केली आहे.
इंदूर जिल्हाधिकारी मनीष सिंह यांनी मंगळवारी जिल्ह्यातील निर्बंध कडक करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर रस्त्यावर कोणीही विनाकारण फिरु नये यासाठी पोलिसांकडून तपासणी केली जात होती. यातच बुधवारी एक व्यक्ती आपल्या श्वानाला फिरण्यासाठी घेऊन रस्त्यावर आलेला पोलिसांना दिसला. हे काम 'अत्यावश्यक' नसल्यामुळे पोलिसांनी त्या व्यक्तीला, आणि त्याच्या श्वानालाही अटक करुन पोलीस ठाण्यात नेले.