चेन्नई :देशात एकीकडे बर्ड-फ्लूच्या भीतीने लोक चिकनकडे पाठ फिरवताना दिसतायत. मात्र, तामिळनाडूमध्ये बिर्याणीची डिमांड वाढताना दिसत आहे. त्याला कारण म्हणजे, विधानसभा निवडणुका. प्रचारापासून मतदानापर्यंत लोकांना बोलावण्यासाठी एक प्लेट बिर्याणी आणि एक 'चपटी' (स्वस्त देशी दारू) पुरेशी असते हे आता सर्वांनाच माहित झालंय. त्यामुळे दोन दिवसांवर आलेल्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडूमध्ये बिर्याणीचा खप वाढलेला दिसून येतोय.
गरीब के प्लेट में पुलाव आया है, लगता है देश में चुनाव आया है..
आधी तिकीट मिळवण्यासाठी, मग उमेदवारी अर्ज भरताना आणि मग प्रचारसभांच्या वेळी 'गर्दी' जमा करणं आवश्यक असतं. त्याशिवाय लोकांना आपल्या 'शक्ती'बाबत कसं समजणार? मात्र, आजकाल असे नेते जवळपास नामशेष झालेत, ज्यांच्या सभांना न बोलावता गर्दी गोळा होईल. मग हा 'लाखोंचा' किंवा गेलाबाजार 'हजारोंचा' जनसागर आणायचा कसा? तर उत्तर आहे, बिर्याणी!
जेव्हा कधी एखादा नेता प्रचारासाठी सभा वा रॅलीचे आयोजन करतो, तेव्हा त्याचे कार्यकर्ते लोकांना 'बिर्याणी आणि बिस्लरी' वाटण्यात व्यग्र असतात. या मेजवानीच्या आमिषानेच ही गर्दी गोळा करण्यात आलेली असते. अशात मग कित्येकदा बिर्याणी कमी पडली म्हणून लोक गदारोळही करतात.