नवी दिल्ली : बिपरजॉय चक्रीवादळाबाबत हवामान खात्याने गंभीर इशारा दिला आहे. आता ते हळूहळू पश्चिम-उत्तर दिशेकडे सरकत आहे. याआधी चक्रीवादळाने पाकिस्तानच्या दिशेने वाटचाल केल्याची चर्चा होती, मात्र आता त्याने आपला मार्ग बदलला आहे. त्याचा परिणाम राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्राच्या किनारी भागात दिसू लागला आहे.
15 जूनपर्यंत गुजरातमध्ये पोहचणार: भारतीय हवामान खात्याने बिपरजॉय चक्रीवादळाविषयी धोक्याचा इशारा दिला आहे. बिपरजॉय चक्रीवादळ हळूहळू पश्चिम-उत्तर दिशेकडे सरकू लागले आहे. याआधी चक्रीवादळाने पास्किस्तानच्या दिशेने वाटचाल करत असल्याची चर्चा होती. परंतु चक्रीवादळाने आपला मार्ग बदलला आहे. याचा परिणाम राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर दिसत आहे. हवामान विभागानुसार, 15 जूनपर्यंत हे चक्रीवादळ गुजरातमध्ये पोहचणार आहे. दरम्यान सौराष्ट्र, कच्छसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आले आहे. तर 16 जूनपर्यंत राजस्थानच्या अनेक भागात वादळा वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मुंबईच्या किनारपट्टी भागात वादळी वारे सुरू : बिपरजॉय चक्रीवादळाची तीव्रता वाढली आहे. याचा परिणाम मुंबईच्या किनारपट्टीवर दिसून आला आहे. हे चक्रीवादळ मुंबईच्या पश्चिमेला सुमारे 540 किमी अंतरावर होते. रविवारपासून मुंबईत वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे. आज सोमवारी ठाणे, रायगड, मुंबई आणि पालघरमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईमध्ये सोसाट्याचा वारा सुरू असून यामुळे विमानतळावरील कामकाजावर परिणाम झाला आहे. विमानतळाची धावपट्टी तात्पुरती बंद करण्यात आली होती. अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.