बिलासपूर :जिल्ह्यातील एका वृद्धाचा रस्ता अपघातात 21 एप्रिल रोजी मृत्यू झाला होता. आता या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. मृत्यूनंतर रुग्णालयातील डॉक्टरांनी मृताची किडनी बाहेर काढल्याचा आरोप नातेवाईकांनी रुग्णालय व्यवस्थापनावर केला होता. मात्र, पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये कुटुंबीयांचे आरोप निराधार असल्याचे घोषित करण्यात आले. या प्रकरणी मृताच्या नातेवाईकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे चौकशीसाठी तक्रार केली होती. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी वृद्धाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्याचे निर्देश दिले होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनंतर पाचपेडी पोलिसांनी महसूल अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मृतदेह बाहेर काढला. नंतर सिम्स मेडिकल कॉलेजमध्ये त्याचे शवविच्छेदन केले.
महिनाभरापूर्वी घडली घटना : मस्तुरी ब्लॉकमधील पाचपेडी पोलीस स्टेशन हद्दीतील सोन गावात राहणारे धरमदास माणिकपुरे हे 14 एप्रिल रोजी सावरीदेरा गावात त्यांचा मुलगा दुर्गेशदास माणिकपुरी याच्या लग्नाची पत्रिका वाटण्यासाठी गेले होते. वाटेत कारने दुचाकीला धडक दिली होती. दोघोही अपघातात गंभीर जखमी झाल्यामुळे दोघांना पामगढ सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते. तेथून त्यांना सिम्स बिलासपूर येथे रेफर करण्यात आले. कुटुंबीयांनी जखमींना बिलासपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने वृद्ध धरमदास यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मुलाच्या पायावरही हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली होती.
नातेवाईकांची तक्रार : 15 एप्रिलच्या रात्री दोन्ही रुग्णांना रुग्णालयात दाखल केले होते. तर 21 एप्रिल रोजी वृद्ध धरमदास यांचा मृत्यू झाला होता. मृत्यूनंतर नातेवाईक धरमदासचा मृतदेह घेऊन घरी गेले. तेव्हा त्यांच्यावर शस्त्रक्रिया किडनीजवळ उजव्या बाजूला झाल्याचे दिसले. त्यानंतर त्यांच्या शरीरातून किडनी काढल्याचा नातेवाईकांना संशय आला. याप्रकरणी मृताच्या मुलाने बिलासपूर जिल्हाधिकार्यांकडे तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला. रस्ता अपघातात जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर मृताच्या मुलांनी डॉक्टरांवर आरोप केले.
दोन्ही किडनी शरीरात सुरक्षित : जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर तपास सुरू करण्यात आला. 25 दिवसांनंतर बुधवारी दंडाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पोलिसांनी कबर खोदून धरमदासचा मृतदेह बाहेर काढला. गुरुवारी मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदनानंतर लहान पीएम अहवालात दोन्ही किडन्या शरीरातच सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले. सिम्स मेडिकल कॉलेजच्या डॉक्टरांनी सांगितले की, सरकारी आदेशाची प्रत पोलिसांनी त्यांच्याकडे सोपवली असून, व्हिडिओग्राफीसह मृताचे पोस्टमॉर्टम करण्यात आले आहे. दोन्ही किडनी शरीरात सुरक्षित असून किडनी चोरीचा प्रश्नच उद्भवत नाही. दोन्ही किडनी मृताच्या नातेवाईकांना दाखवण्यात आल्या आहेत.
किडनीजवळ ऑपरेशनच्या जखमा :उजव्या बाजूला किडनीजवळ केलेल्या ऑपरेशनच्या जखमा पाहून या ठिकाणाहून किडनी काढण्यात आल्याचा संशय नातेवाईकांना आला. परंतु वैद्यकीय शास्त्राच्या नियमांनुसार डोक्याचे ऑपरेशन करताना पोटाच्या बाजूला असलेल्या किडनीजवळ ऑपरेशन करून डोक्याचे काढलेले हाड सुरक्षित राहून शरीराचे तापमान राखले जाते.