बेंगळुरू (कर्नाटक) : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कर्नाटक दौऱ्यावरून परतत असताना त्यांच्या सुरक्षेत त्रुटी आढळून आल्या. रविवारी ते येथील 103 फूट उंच राष्ट्रध्वज फडकवण्यासाठी बीदर जिल्ह्यातील गोरटा मैदानात पोहोचले आणि गोरटा मैदानावर 'गोरटा शहीद स्मारक' आणि सरदार वल्लभभाई पटेल स्मारकाचे उद्घाटन केले. याशिवाय अनेक कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर ते बंगळुरूच्या ताज वेस्ट एंड हॉटेलमधून एचएएल विमानतळाकडे रवाना झाले. यादरम्यान दोन तरुण गृहमंत्र्यांच्या ताफ्याचा सुमारे 300 मीटर दुचाकीवरून पाठलाग करताना दिसले. त्यानंतर पोलसांनी ही कारवाई केली आहे.
निष्काळजीपणे वाहन चालवल्याबद्दल गुन्हा : काल रात्री अकराच्या सुमारास अमित शहा आणि त्यांच्या ताफ्याची वाहने एचएएल विमानतळाच्या दिशेने येत असताना दोन्ही तरुणांनी त्यांच्या दुचाकीवरून मणिपाल सेंटरपर्यंत त्यांचा पाठलाग केला. तेव्हाच सुरक्षेत तैनात असलेल्या पोलिसांनी तरुणांना रोखले. दुचाकीस्वारांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. चौकशीनंतर बेंगळुरूच्या कमर्शियल स्ट्रीट पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली. त्याच्याविरुद्ध आयपीसी कलम 353 अन्वये अधिकृत कर्तव्यात अडथळा आणणे आणि कलम 279 नुसार निष्काळजीपणे वाहन चालवल्याबद्दल गुन्हा नोंदवून कारवाई करण्यात आली आहे.